मानोरा, मालेगाव नगर पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी ७ आॅगस्ट रोजी निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 06:49 PM2018-08-01T18:49:11+5:302018-08-01T18:50:09+5:30
वाशिम : मानोरा व मालेगाव नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष, उपाध्यक्षांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ ८ आॅगस्टला संपुष्टात येणार असल्याने ७ आॅगस्ट रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मानोरा व मालेगाव नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष, उपाध्यक्षांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ ८ आॅगस्टला संपुष्टात येणार असल्याने ७ आॅगस्ट रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. ७ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजता विशेष सभा होणार. अध्यक्ष पदाकरीता ४ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज सादर करावा लागणार आहे.
मानोरा पगर पंचायतची सदस्य संख्या १७ एवढी आहे. त्यापैकी भारिप बहूजन महासंघ व हेमेंद्र ठाकरे मित्र मंडळाचे ७ सदस्य, काँग्रेस ४, शिवसेना व भाजपा प्रत्येकी २ आणि राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल आहे. विद्यमान नगराध्यक्ष रेखा पाचडे या भारिप बमसं व हेमेंद्र ठाकरे मित्र मंडळाच्या आहेत. त्यांची निवड अविरोध झाली होती. आगामी नगराध्यक्ष पद अनुसुचित जातीकरिता आरक्षित आहे. भारिप बमसं व हेमेंद्र ठाकरे मित्र मंडळाकडे मंजुुषा महेश निशाने, काँग्रेसकडे बरखा बेग आणि भाजपाकडे ज्ञानेश्वर गोतरकर हे तीन उमेदवार दावेदार आहेत.
मालेगाव नगर पंचायतमध्ये एकूण सदस्य संख्या १७ असून यामध्ये काँग्रेस चार, राष्ट्रवादी काँग्रेस चार, शिवसंग्राम चार, शिवसेना तीन, भाजप एक व अपक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे. आता नगराध्यक्ष पद खुला प्रवर्ग (महिला) असल्याने घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. मालेगाव नगर पंचायतवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. राकाँच्या मीनाक्षी सावंत या विद्यमान नगराध्यक्ष आहेत. यावेळी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष होईल, अशी चर्चा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा उमेदवार नगराध्यक्ष होईल, अशी शक्यता असून, काँग्रेसतर्फे रूपाली टनमने, आफसाना सै. तस्लीम तर राकाँतर्फे रेखा अरूण बळी या दावेदार असल्याचे बोलले जात आहे. शिवसंग्रामचे चार सदस्य आणि शिवसेनेचे तीन सदस्य या निवडणुकीत नेमकी काय भूमिका घेतात, याकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे.
मानोरा व मालेगाव येथे राजकीय घडामोडींना वेग आला असून सत्ता कायम टिकविण्यासाठी सत्ताधारी गटातर्फे तर सत्ता हिसकावून घेण्यासाठी विरोध गटातर्फे फिल्डिंग लावली जात असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
अध्यक्ष पदाकरीता ४ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज सादर करावा लागणार असून ७ आॅगस्ट रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. यासाठी ७ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजता विशेष सभा होणार असून या सभेचे अध्यासी अधिकारी म्हणून तहसिलदार कामकाज पाहणार आहेत.