मानोरा नगर पंचायतमध्ये सत्तांतर; नगर विकास आघाडीची सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 06:06 PM2018-08-07T18:06:28+5:302018-08-07T18:08:52+5:30
वाशिम : नगर पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ७ आॅगस्ट रोजी मानोरा येथे सत्तांतर झाले असून, मालेगाव येथे अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची अविरोध निवडणूक झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : नगर पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ७ आॅगस्ट रोजी मानोरा येथे सत्तांतर झाले असून, मालेगाव येथे अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची अविरोध निवडणूक झाली. मानोरा येथील भारिप-बमसं, हेमेंद्र ठाकरे मित्रमंडळाची सत्ता गेली असून, येथे नगर विकास आघाडीच्या बरखा अलताफ बेग तर उपाध्यक्षपदी अमोल प्रकाश राऊत यांचा १० विरूद्ध सात मताने विजय झाला. मालेगाव येथे अध्यक्षपदी रेखा बळी तर उपाध्यक्षपदी संतोष जोशी यांची अविरोध निवड झाली.
मालेगाव व मानोरा नगर पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्षांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ ८ आॅगस्ट रोजी संपुष्टात येणार असल्याने ७ आॅगस्ट रोजी निवडणूक घेण्यात आली. मालेगाव येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. यावेळी नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गातील महिला असे आरक्षीत असून, काँग्रेसला दूर ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसचे रेखा अरुण बळी, गजानन सारसकर, मीनाक्षी सावंत, शितल उमेश खुळे, शिवसेनेचे संतोष जोशी, मदन राऊत, कविता देवा राऊत, शिवसंग्रामचे रामदास बळी, सुषमा अमोल सोनोने, भाजपचे किशोर महाकाळ हे एकत्र आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू भक्कम झाली. अध्यक्ष पदासाठी राकाँच्या रेखा बळी यांचा तर उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे संतोष जोशी यांचा एकमेव अर्ज आल्याने अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड अविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले.
मानोरा नगर पंचायत येथे भारिप-बमसं व हेमेंद्र ठाकरे मित्रमंडळाची सत्ता होती. ७ आॅगस्ट रोजी झालेल्या निवडणुकीत सर्वपक्षीय १० नगरसेवकांनी एकत्र येत नगर विकास आघाडीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या उमेदवारांना मतदान करून भारिप-बमसं व हेमेंद्र ठाकरे मित्रमंडळाला सत्तेबाहेर ठेवले. नगराध्यक्षपदी नगर विकास आघाडीच्या बरखा बेग तर उपाध्यक्षपदी अमोल राऊत विजयी झाले.
अडीच वर्षांपूर्वी मानोरा नगर पंचायत येथे भारिप-बमसं व हेमेंद्र ठाकरे गटाने सत्ता प्राप्त करुन शिवसेना, भाजपा, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवले होते. ७ आॅगस्ट रोजी सर्वपक्षीय १० नगरसेवकांनी एकत्र येत सत्तांतर घडवून आणले.
या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाकरीत भारिप-बमसंकडून मंजुषा महेश निशाने यांना ७ मते पडली तर नगर विकास आघाडीच्या बरखा बेग यांना १० मते पडली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन तहसीलदार डॉ.सुनिल चव्हाण यांनी तर सहायक निवडणुक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी अमोल माळकर यांनी कामकाज पाहिले. नगर विकास आघाडीच्या १० नगरसेवकांमध्ये भारिप-बमसंचे दोन सदस्य, काँग्रेसचे चार, शिवसेना दोन, भाजपा एक, राष्ट्रवादी काँग्रेस एक असे नगरसेवक आहे.