पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी मानोरा पोलिसांचाही पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 02:53 PM2018-04-14T14:53:52+5:302018-04-14T14:53:52+5:30
वाशिम: रखरखत्या उन्हात पाण्यावाचून पक्ष्यांचा जीव धोक्यात येत आहे. ही बाब लक्षात घेत मानोरा पोलिसांनी पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
वाशिम: रखरखत्या उन्हात पाण्यावाचून पक्ष्यांचा जीव धोक्यात येत आहे. ही बाब लक्षात घेत मानोरा पोलिसांनी पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पोलीस स्टेशनच आवारात त्यांनी पक्ष्यांसाठी अनेक जलपात्रे बांधून त्यात नियमित पाणी भरणे सुरू केले आहे. यासाठी वाईल्डलाइफ कन्झर्वेशन टीमच्या कोलार शाखेतील वन्यजीवरक्षकांचे सहकार्य त्यांना लाभले आहे.
गत काही वर्षांपासून वारेमाप झालेल्या वृक्षतोडीमुळे पक्ष्यांचा अधिवासच धोक्यात आला आहे. त्यातच जंगलातील पाणवठे नष्ट होत असून, गतवर्षीच्या अपुºया पावसामुळे जिल्ह्यातील जनतेलाच भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावशिवारात प्राणी, पक्ष्यांना तहान भागविणे कठीण झाले आहे. रखरखत्या उन्हात पक्षी पाण्यासाठी सैरभैर फिरत असल्याने यांचा जीव धोक्यात आला आहे. ही बाब लक्षात घेऊन मानोरा पोलिसांनीही पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीम मंगरुळपीरच्या कोलार शाखेकडून त्यांनी जलपात्रे घेऊन ती पोलीस स्टेशनच्या परिसरात बांधली आणि त्यात नियमित पाणी टाकणे सुरू केले आहे. शेकडो पक्षी या जलपात्रातील पाणी पिऊन तहान भागविताना दिसत आहे. पोलीस निरीक्षक रामकृष्ण मळघने यांच्यासह जमादार सुनिल गौतमकर यांच्या हस्ते ही जलपात्रे बांधण्यात आली. यासाठी रुद्राळाचे पोलीस पाटील आणि वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमच्या कोलार शाखेचे संदीप ठाकरे, श्रीकांत डापसे, उमेश जंगले, नंदू सातपुते, गौरव पुसदकर, प्रविण अंबोरे, शुभम सावळे, विवेक तिहिले, अर्जुन अंबोरे आदिंनी सहकार्य केले.