मानोरा ग्रामीण रुग्णालयास रिक्त पदांचे ग्रहण
By admin | Published: July 17, 2017 02:31 AM2017-07-17T02:31:11+5:302017-07-17T02:31:11+5:30
रुग्णांची गैरसोय: अधीक्षकांसह आवश्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या मानोरा ग्रामीण रुग्णालयाला रिक्त पदाचे ग्रहण लागले आहे. त्यातच इतर सोयीसुविधांचाही अभाव असल्यामुळे रुग्णावर जुजबी प्राथमिक उपचार करुन रेफर करण्यापलिकडे येथे कार्यरत अधिकाऱ्यांना नाईलाजास्तव करावे लागत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून रिक्त पदांचा तिढा सोडवावा अशी मागणी होत आहे.
तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय असल्यामुळे साधारण आजारांवर उपचार घेणाऱ्या गोरगरीब रुग्णांसह अनेक गंभीर स्वरुपाचे रुग्ण येथे येतात, परंतु ग्रामीण रुग्णालयात अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. आवश्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे अनेक रुग्णांना आल्यापावली परत जावे लागत आहे. या रुग्णालयातील अतिशय महत्वाचे वैद्यकीय अधिक्षक हे पद अनेक वर्षापासून रिक्त असून, या पदाचा प्रभार वैद्यकीय अधिकारी महेश राठोड सांभाळतात त्यासोबतच वैद्यकीय अधिकाऱ्यांंची दोन पदेही रिक्त आहेत. त्यामुळे इतर ठिकाणच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना येथे येऊन उपचार करावे लागतात. रुग्णालयातील असंसर्गजन्य व्याधी विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्त असून, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची चार पदे रिक्त आहेत. त्यातही यामधील महिला वैद्यकीय अधिकारी हे पद रिक्त असल्यामुळे शाळांमधील मुलीची तपासणी करणे अशक्य झाले आहे. असंसर्गजन्य व्याधी विभागातील महत्वाचे पद रिक्त असल्यामुळे मधुमेह रक्तदाब , कर्करोग , मूत्रपिंडाचे आजार आदिंवर उपचार होत नाहीत. परिणामी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना इतर ठिकाणी ‘रेफर’ करण्यापलिकडे येथे पर्यायही उरलेला नाही. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपासून क्ष-किरण तपासणी तंत्रज्ञ नसल्यामुळे येथील क्ष-किरण तपासणी यंत्रही धूळखात पडले आहे.