मानोरा ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदांचा अहवाल वरिष्ठस्तरावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 01:53 PM2019-10-19T13:53:58+5:302019-10-19T13:54:11+5:30
आमदार राजेंद्र पाटणी यांनीही या रुग्णालयातील समस्येचा विचार करून आरोग्य विभागाकडे २० ते २५ वेळा पत्रव्यवहार केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : येथील ग्रामीण रुग्णालयात रिक्त पदांचा अहवाल गेल्या अनेक महिन्यांपासून वरिष्ठस्तरावर पाठविण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत या रुग्णालयात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली. दरम्यान, आमदार राजेंद्र पाटणी यांनीही या रुग्णालयातील समस्येचा विचार करून त्या दूर करण्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाकडे २० ते २५ वेळा पत्रव्यवहारही केला आहे.
मानोरा तालुक्यातील ग्रामीण रुग्णांना मोफत आणि चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून मानोरा शहरात ३५ खाटांचे ग्रामीण रूग्णालय थाटण्यात आले. यामुळे गोरगरीब जनतेला आरोग्य विषयक समस्याही उपलब्ध झाल्या. कालांतराने या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांची संख्या बदली, सेवानिवृत्ती आदि कारणांमुळे घटू लागली. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला असुविधांचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन स्थानिक आमदार राजेंद्र पाटणी यांनी थेट शासनाच्या आरोग्य विभागाकडे केवळ मानोरा ग्रामीण रुग्णालयच नव्हे, तर जिल्हाभरातील ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदांच्या समस्येसह औषधींचा तुटवडा आणि अद्ययावत यंत्रांचा अभाव दूर करण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यामुळे बºयाच समस्या दूरही झाल्या असून, गोरगरीब रुग्णांना आवश्यक औषधीही उपलब्ध होऊ लागल्या. तसेच, क्ष-किरण तपासणीसाठी तज्ज्ञ कर्मचाºयांचा तुटवडा भासत होता. ती समस्या सोडविण्यासाठी मानोरा ग्रामीण रुग्णालयातील क्ष-किरण तंत्रज्ञाच्या रिक्त पदाचा अतिरिक्त प्रभार कारंजा येथील कर्मचाºयाकडे सोपविण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले. त्यामुळे क्ष-किरण तपासणीची समस्याही दूर झाली आहे. आता वातावरणातील बदलामुळे विविध आजारांनी तोंड वर काढल्यानंतर या रुग्णालयात रुग्णांची गर्दी उसळत आहे. ग्रामीण भागातील रुग्णांचे आरोग्य यामुळे धोक्यात येऊ नये म्हणून जिल्हा आरोग्य अधिकाºयांनी येथे अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येत असल्याचेही जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले.