साहेब, आम्हाला शिक्षक द्या हो! विद्यार्थ्यांची आर्त हाक
By संतोष वानखडे | Published: August 28, 2023 03:44 PM2023-08-28T15:44:49+5:302023-08-28T15:47:32+5:30
चार वर्ग अन् एक शिक्षक.
संतोष वानखडे, वाशिम : श्रीक्षेत्र, कोंडोली (ता.मानोरा) येथील केंद्रीय मराठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीपर्यंत वर्ग असताना शिक्षणसेविका मात्र एकच आहे. आणखी एक शिक्षक मिळावा, असे साकडे पालकांसह विद्यार्थ्यांनी २८ ऑगस्ट रोजी दुपारी २:०० वाजता पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना घातले.
कोंडोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वर्ग १ ते ४ असून, एकूण ५९ पटसंख्या आहे. येथे एकच शिक्षणसेविका आहे. मानोरा तालुक्यातील कोंडोली येथील ही शाळा जुनी असल्याने परिसरातील मोठ्या संख्येने जुन्या लोकांनी शिक्षण घेतले. त्यांच्या वारसांना निर्गम उतारा, शाळा सोडल्याचे दाखले, जात पडताळणी समितीची भेट नेहमीच चालू असल्याने एका शिक्षिकेची चांगलीच दमछाक होत आहे. शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याकडे लक्ष देऊन आणखी एका शिक्षकाची नियुक्ती करण्याची मागणी गावकऱ्यांनी वारंवार प्रशासनाकडे केली होती. मात्र, याकडे कोणीच लक्ष देत नसल्याचे पाहून, सोमवारी (दि. २८) विद्यार्थ्यांसह पालक, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी कार्यालय गाठून आपबिती कथन केली.