मानोरा येथील पीक वाढ संजिवकाच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 03:16 PM2018-05-18T15:16:17+5:302018-05-18T15:16:17+5:30
वाशिम : गत काही महिन्यांपासून हुलकावणी देणाऱ्या मानोरा येथील एका पीक वाढ संजिवक गोरखधंद्याचा पर्दाफाश करण्यात कृषी विभागाला अखेर १७ मे रोजी यश आले. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने पीक वाढ संवर्धकाचा साठा जप्त करून पुढील आदेशापर्यंत विक्री बंदचे आदेश दिले.
वाशिम : गत काही महिन्यांपासून हुलकावणी देणाऱ्या मानोरा येथील एका पीक वाढ संजिवक गोरखधंद्याचा पर्दाफाश करण्यात कृषी विभागाला अखेर १७ मे रोजी यश आले. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने पीक वाढ संवर्धकाचा साठा जप्त करून पुढील आदेशापर्यंत विक्री बंदचे आदेश दिले.
काही पिकांचे उत्पादन फलधारणा योग्य न झाल्याने घटते, तर काही पिकांमध्ये फलधारणा प्रमाणापेक्षा जास्त झाल्याने विरळणीची गरज भासते. पीक वाढ संजिवकांद्वारे या दोन्ही गोष्टींवर नियंत्रण ठेवून, पिकांचे उत्पन्न व दर्जा वाढविता येत असल्याचे पटवून देऊन या संजिवकांची शेतकºयांना विक्री केली जाते. मानोरा येथे कृषी विभागाची परवानगी न घेता तसेच गुणवत्तेसंदर्भात कोणतीही तपासणी व चाचणी न करता पीक वाढ संजिवकाचा गोरखधंदा सुरू असल्याच्या तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या. या तक्रारीच्या अनुषंगाने यापूर्वी मानोरा येथे छापे मारण्यात आले. मात्र, या गोरखधंद्याचा पर्दाफाश करण्यात कृषी विभागाला यश आले नव्हते. १७ मे रोजी गुप्तता बाळगत कृषी विकास अधिकारी नरेंद्र बारापात्रे व तालुका कृषी विभागाच्या पथकाने पीक वाढ संजिवकाच्या ठिकाणाचा शोध लावण्यात यश मिळविले. पीक वाढ संजिवकाचे ‘रिपॅकिंग’ करून साठा असल्याचे यावेळी निदर्शनात आले. संजिवकाचे नमुने घेऊन तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. हा गोरखधंदा करणाºया ‘त्या’ इसमाकडे एका कंपनीचे नोंदणीकृत प्रमाणपत्र आहे. मात्र, कृषी विभागाचा परवाना व अन्य प्रशासकीय सोपस्कार करण्यात आले नसल्याचे दिसून आले. संजिवकाच्या गुणवत्तेसंदर्भात प्रयोगशाळेचा अहवाल येईपर्यंत व पुढील आदेशापर्यंत संजिवक विक्री बंदचे आदेश देण्यात आले, अशी माहिती कृषी विकास अधिकारी बारापात्रे यांनी दिली. या कारवाईप्रसंगी तालुका कृषी अधिकारी समाधान पडघान, पंचायत समितीचे कृषी अधिकारी गजेंद्र चितावार आदींची उपस्थिती होती.