स्वस्त धान्याच्या अनेक तक्रारी; कारवाई मात्र शून्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 10:51 PM2017-08-26T22:51:34+5:302017-08-26T22:53:37+5:30
तक्रारींची दखल घेण्याची तसदी नाही
किशोर मापारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : बुलडाणा जिल्ह्यात सध्या स्वस्त धान्य दुकानांमधील स्वस्त धान्याची काळ्याबाजारातच मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. त्याला लोणार तालुका ही अपवाद राहिलेला नाही. स्वस्त धान्याबाबत अनेक तक्रारी तहसील कार्यालयात दाखल असताना संबंधित अधिकारी देवाण-घेवाण करून तक्रारी निपटारा करण्याच्या मागे लागलेले आहेत.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अशासकीय सदस्य डॉ. भास्कर मापारी यांनी शासकीय गोदामावर प्रत्यक्षात भेट देऊन मापात पाप करून घोटाळा होत असल्याचे तहसीलदार सुरेश कव्हळे यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यावर कारवाई करण्याबाबत तक्रारदेखील केली होती. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य राजेश मापारी यांनीही रेशनमधील साखर घोटाळा उघड केला होता. अशा अनेक तक्रारी झाल्यानंतर तहसीलदार कव्हळे यांनी केवळ पत्रव्यवहार करून कारवाई करीत असल्याचे सांगितले; मात्र प्रत्यक्षात कारवाई झालीच नाही. रेशनच्या मालाची तस्करी करणारे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. संपूर्ण विदर्भात याची पाळेमुळे पसरलेली असून, रेशनचा माल काळ्याबाजारात विकण्याकरिता नवनवीन क्लृप्त्या अन्नपुरवठा विभागाकडून आखल्या जातात. परिणामी, रेशन माफियांचे चांगलेच फावते. शासनाच्यावतीने द्वारपोच योजना सुरू करण्यात आली आहे; मात्र द्वारपोच धान्य मिळत नसल्याच्याही अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
२स्वस्त धान्य वितरण प्रणालीत तालुक्यात भोंगळ कारभार सुरू असल्याचे या घटनांवरून निदर्शनास येत आहे.