गुंठेवारी नियमित करण्यासाठी प्लाॅटधारकांसमाेर अनेक अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:26 AM2021-07-09T04:26:08+5:302021-07-09T04:26:08+5:30
नंदकिशाेर नारे वाशिम : गुंठेवारी नियमित करण्याचा निर्णय झाल्याने गुंठेवारीने प्लाट (भूखंड) घेणाऱ्या नागरिकांत आनंदाचे वातावरण असतानाच अनेक भूखंड ...
नंदकिशाेर नारे
वाशिम : गुंठेवारी नियमित करण्याचा निर्णय झाल्याने गुंठेवारीने प्लाट (भूखंड) घेणाऱ्या नागरिकांत आनंदाचे वातावरण असतानाच अनेक भूखंड घेणारे अडचणीत सापडल्याने त्यांच्या आनंदात विरजण पडले आहे.
मागील अनेक वर्षांपासून शहर व परिसरात गुठेवारी नियमित करण्याची पद्धत बंद हाेती. खा. भावना गवळी यांनी वरिष्ठांशी चर्चा करून, पुढाकार घेऊन हे सुरू करून भूखंडधारकांना दिलासा दिला. त्यांचे सर्वत्र काैतुक हाेत असतानाच आता भूखंड प्रतिज्ञापत्राद्वारे, नाेटरीद्वारे खरेदी केलेल्यांना अनेक अडचणींना सामाेरे जावे लागत आहे. त्यामुळे मिळालेल्या मुदतीत प्रस्ताव सादर हाेईल की नाही, याची चिंता भूखंडधारकांना पडली आहे. गुंठेवारी नियमित करण्याकरिता ५ जुलै ते ४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली असून नागरिकांनी आपले प्रस्ताव न.प.कडे सादर करावेत, असे आवाहन नगर परिषदेतर्फे करण्यात येत आहे.
--------------
भूखंड मालकासमाेर येत असलेल्या अडचणी
अनेक शेतमालकांनी आपल्या शेतामध्ये प्लाॅट (भूखंड) पाडून नागरिकांना नाेटरी करून, प्रतिज्ञापत्रांवर विकले आहेत. आता ज्यांनी भूखंड घेतले ते नियमानुकूल करण्यासाठी तलाठ्याकडे ते जात असताना त्यांना आधी मूळ मालकाला पूर्ण भूखंड नावावर करून घ्यावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या नावावर खरेदी करून घेऊन नियमानुकूल करण्यासाठी प्रस्ताव सादर करू शकता, असे सांगण्यात येत आहे. यामुळे अनेक भूखंड खरेदी करणारे अडचणीत आले असून काय करावे, असा प्रश्न त्यांच्यासमाेर निर्माण झाला आहे.
अनेक शेतमालकांनी भूखंडची विक्री केल्यानंतर शहर साेडून माेठ्या शहराच्या ठिकाणी वास्तव्यास गेले आहेत, तर काही जण हयात नाहीत. अशा वेळी भूखंड खरेदी केलेल्या नागरिकांना अडचणीचे ठरत आहे. याकरिता वरिष्ठांचे मार्गदर्शन घेण्याकरिता ते अनेकांच्या घरांच्या पायऱ्या तुडवितांना दिसून येत आहेत.
-------------
आवश्यक कागदपत्रे
विहित नमुन्यात अर्ज
मालकीचा पुरावा (खरेदी)
७/१२, नमुना ड
नाेंदणीकृत अभियंता प्रमाणित भूखंडावरील बांधकामाचा आराखडा
माेजणी शिट
हमीपत्र
शपथपत्र/ करार पत्र
नाेंदणीकृत अभिन्यास नकाशा
---------
शिवसेनेचा पुढाकार
कागदपत्रांची यादी व नमुने वाशिम शहर शिवसेना व युवा सेनेतर्फे पाटणी चौक वाशिम येथे ६ जुलै ते १६ जुलैपर्यंत सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत मोफत अर्ज देण्यात येतील व १७ जुलै ते ४ ऑगस्टपर्यंत खासदार गवळी यांचे जनसंपर्क कार्यालय, पोस्ट ऑफिस चौक वाशिम येथे देण्यात येतील. नागरिकांनी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे हस्तगत करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.