१५ दिवस उलटूनही अनेकांना मिळाले नाही ‘ईएमव्ही चीप बेस्ड एटीएम कार्ड’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 05:08 PM2019-01-16T17:08:05+5:302019-01-16T18:13:14+5:30
वाशिम : २०१६ पूर्वी वितरित केलेले जुने ‘एटीएम’ ३१ डिसेंबरपासून बंद करून त्याऐवजी ग्राहकांना ‘ईएमव्ही चीप बेस्ड एटीएम’ दिले जात आहेत. मात्र, १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही अद्याप (१६ जानेवारी) अनेकांना नव्या पद्धतीचे ‘एटीएम’ मिळालेले नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : २०१६ पूर्वी वितरित केलेले जुने ‘एटीएम’ ३१ डिसेंबरपासून बंद करून त्याऐवजी ग्राहकांना ‘ईएमव्ही चीप बेस्ड एटीएम कार्ड’ दिले जात आहेत. मात्र, १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही अद्याप (१६ जानेवारी) अनेकांना नव्या पद्धतीचे ‘एटीएम’ मिळालेले नाहीत. बँकींग क्षेत्रातील या गोंधळामुळे नागरिकांचे आर्थिक व्यवहार खोळंबले असून छोट्या-मोठ्या रक्कमेच्या ‘विड्रॉल’साठीही त्यांना बँकेत जावे लागत असल्याचे दिसून येत आहे.
सुरक्षेचा मुद्दा समोर करून एटीएम सेवा पुरविणाऱ्या सर्वच बँकांनी ‘ईएमव्ही चीप’ (यूरोपे मास्टरकार्ड व्हीसा) नसलेले सर्व एटीएम कार्ड ३१ डिसेंबरअखेर ‘ब्लॉक’ केले आहेत. त्याऐवजी ‘ईएमव्ही चिप’ असलेले नवीन एटीएम कार्ड दिले जात आहेत. मात्र, मुंबई येथील एटीएम कार्ड विभागाकडून सदर कार्ड नागरिकांच्या पत्यावर पाठविण्यास प्रचंड विलंब लागत असून बहुतांश ग्राहकांना अद्याप हे कार्ड प्राप्त झालेले नाही. त्यामुळे संबंधित नागरिक बँकांमध्ये जावून चौकशी करित आहेत; परंतु नवीन एटीएम कार्ड मिळायला आणखी ७ ते ८ दिवस लागतील आणि ते घरच्या पत्यावरच पाठविले जाईल, असे सांगून बँकांकडून ग्राहकांची बोळवण केली जात आहे.
‘डिजिटल बँकींग’चा अधिक सुरक्षित पर्याय म्हणून ‘ईएमव्ही चीप बेस्ड् एटीएम’ फायदेशीर ठरणार आहे. मुंबई येथील कार्ड विभागाकडून सर्व ग्राहकांच्या पत्यावर सदर ‘एटीएम’ पाठविण्यात येत असल्याने त्यास विलंब लागत आहे. ग्राहकांनी संयम बाळगावा, अशी अपेक्षा आहे.
- दत्तात्रय निनावकर
व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, वाशिम