डॉक्टरांची अनेक पदे रिक्त, रुग्णांची हेळसांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:30 AM2021-09-02T05:30:26+5:302021-09-02T05:30:26+5:30
वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण २५ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असून, या रुग्णालयात सेवेत असलेल्या १८ बीएएमएस डॉक्टरांना एकाच वेळी काढून टाकण्यात ...
वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण २५ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असून, या रुग्णालयात सेवेत असलेल्या १८ बीएएमएस डॉक्टरांना एकाच वेळी काढून टाकण्यात आलेले आहे. या आरोग्य उपकेंद्रामार्फत ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू नागरिकांना आरोग्यविषयक सोयी, सुविधा शासनाकडून पुरविल्या जातात. शासनाने बीएएमएस पात्रताप्राप्त डॉक्टरांना कंत्राटी तत्त्वावर सेवेत घेतलेले होते. बीएएमएस अर्हताधारक डॉक्टरांनी महामारी कालावधीमध्ये प्राण पणास लावून नागरिकांसाठी सेवा दिलेली असतानाही शासनाने बीएएमएस डॉक्टरांच्या सेवेची कुठल्याही प्रकारे सहानुभूती न दाखविता त्यांच्या जागेवर बंधपत्रित एमबीबीएस डॉक्टरांना नियुक्ती देऊन तदर्थ बीएएमएस डॉक्टरांना एका फटक्यात सेवामुक्त करण्याचा अन्याय्य निर्णय जिल्ह्यात घेतला. एमबीबीएस डॉक्टरही आता नोकरी सोडून गेल्याने व बीएएमएस डॉक्टरांची सेवा समाप्त केल्याने वाशिम जिल्हा आणि मानोरा तालुक्यातील अनेक रुग्णालयातील डॉक्टरांची पदे रिक्त आहेत.
मानोरा तालुक्यातील कुपटा आणि दापुरा या आरोग्य उपकेंद्रावर नियुक्तिला असलेले ॲलोपॅथिक डॉक्टर बहुतांश वेळा गैरहजर वा पूर्ण वेळ रुग्णांच्या सेवेसाठी हजर राहात नसल्याने या भागातील नागरिकांना प्रचंड आर्थिक आणि शारीरिक हालअपेष्टा सोसाव्या लागत आहेत.