मराठा आरक्षण : वाशिम मध्ये जल्लोष अन् फटाक्यांची आतषबाजी
By संतोष वानखडे | Published: January 27, 2024 04:32 PM2024-01-27T16:32:41+5:302024-01-27T16:32:57+5:30
सकाळी ९ वाजताच्या सुमारास नवी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांची छोटेखानी जाहिर सभा झाली अन् इकडे जिल्ह्यातही जल्लोष अन् फटाक्यांची आतषबाजी झाली.
वाशिम : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानावर धडकण्यापूर्वीच २७ जानेवारीला पहाटेच्या सुमारास मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने अध्यादेश काढला. सकाळी ९ वाजताच्या सुमारास नवी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांची छोटेखानी जाहिर सभा झाली अन् इकडे जिल्ह्यातही जल्लोष अन् फटाक्यांची आतषबाजी झाली.
ओबीसीच्या नोंदी आढळलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २६ जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. मराठा आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येने मुंबईकडे निघालेली पदयात्रा बघून राज्य सरकारनेही तातडीने पावले उचलली आणि मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढला.
मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याला अभूतपूर्व यश मिळाल्याने राज्यभरात मराठा समाजबांधवांकडून जल्लोष, मिरवणूक, गुलालाची उधळण अन् फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यातही जल्लोष अन् फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. वाशिम, मानोरा, मंगरूळपीर शहरात मराठा आरक्षणाचे स्वागत करण्यात आले तर रिसोडात फटाक्यांची आतषबाजी झाली. मालेगावात पेढे वाटून आनंद साजरा झाला.