समानांतर साहित्य उत्सवात मराठीचा बोलबाला - मोहन शिरसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 01:19 PM2020-02-22T13:19:19+5:302020-02-22T13:19:28+5:30
राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेत माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले शिक्षक मोहन शिरसाट यांच्याशी साधलेला संवाद.
वाशिम : येथील राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेत माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले शिक्षक मोहन शिरसाट यांनी कवी, साहित्यीक आणि लेखक म्हणूनही आपला ठसा उमटविला. २१ फेब्रूवारीपासून जयपूर (राजस्थान) येथे सुरू असलेल्या जागतीक दर्जाच्या समानांतर साहित्य उत्सवात त्यांची ‘मराठीचे बोलू कौतुके’ या विषयावरील कार्यक्रमात प्रतिनिधीत्व व कविता वाचन करण्यासाठी निवड झाली. ही जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रासाठी भुषणावह बाब असून यानिमित्त त्यांच्याशी साधलेला हा संवाद...
समानांतर साहित्य उत्सवाचे वैशिष्ट्य काय?
राजस्थान प्रगतीशील लेखक संघाच्या वतीने जयपूर येथे २१ ते २३ फेब्रूवारी या कालावधीत ‘पॅरलल लिटरेचर फेस्टीवल’ अर्थात समानांतर साहित्य उत्सव आयोजित करण्यात आला. तब्बल १२७ सत्रांमध्ये चालणाºया या साहित्य मेळ्यात नेपाळ, भुतान, पाकिस्तान, बांग्लादेश यासह भारभरातून येणारे साहित्यिक आपापल्या प्रांतातील भाषा, संस्कृतीचा उलगडा करणार आहेत. भारतातील विविधतेचा गौरव करणारा हा महोत्सव जयपूरात अत्यंत लोकप्रिय आहे. महात्मा गांधी, मिर्झा गालिब यांच्या विचार साहित्यावरही उत्सवादरम्यान विशेष सत्र ठेवण्यात आले.
उत्सवातील तुमच्या सहभागाबद्दल काय सांगाल?
समानांतर साहित्य उत्सवात भारतातील अन्य भाषांप्रमाणेच मराठी भाषेलाही विशेष महत्व देण्यात आले. त्यानुसार, ‘मराठीचे बोलू कौतुके’ या शिर्षकांतर्गत आयोजित कार्यक्रमात माझी महाराष्ट्र प्रगतिशील लेखक संघाकडून प्रतिनिधीत्व करण्यासाठी तथा कविता वाचन करण्यासाठी निवड झाली. हा आजवरच्या आयुष्यात आपणास मिळालेला बहुमान असल्याचे मी मानतो. उत्सवात मराठी भाषेचा विशेष बोलबाला राहिला.
इतर कुठले मान्यवर सहभागी आहेत?
न्यायमूर्ती विनोद शंकर दवे, कवी ऋतुराज, नरेंद्र सक्सेना, राजेश जोशी, उदय प्रकाश, मंगेश डबराल, लीलाधर मंडलोई, अजय नावरिया, ममता कालिया, सुधा अरोडा, मृणाल तालुकदार, गीताश्री, जितेंद्र भाटिया, धिरेंद्र अस्थाना, रमशरण जोशी, विभूती नारायण राय, अरुण राय, नंदकिशोर आचार्य, प्रेमचंद गांधी, कैलास मनहर यांच्यासह भारतीय भाषांमधील ३५० पेक्षा अधिक साहित्यिकांनी समानांतर साहित्य उत्सवात सहभाग नोंदविला आहे.