शिरपूर येथील विकास कामातील अनियमिततेसंदर्भात १५ मार्चला सुनावणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 01:32 PM2019-03-12T13:32:52+5:302019-03-12T13:33:37+5:30
शिरपूर जैन (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील शिरपूर ग्राम पंचायतच्या विकास कामातील अनियमिततेबाबत १५ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील शिरपूर ग्राम पंचायतच्या विकास कामातील अनियमिततेबाबत १५ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे शिरपूरसह मालेगाव तालुक्याचे लक्ष लागून आहे. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या विस्तार अधिकाºयांच्या चौकशी अहवालानुसार ही सुनावणी होणार आहे.
शिरपूर जैन येथील माजी सरपंच सुशांत जाधव, गणेश भालेराव यांच्यासह ग्राम पंचायतच्या सात सदस्यांनी चौदाव्या वित्त आयोगातील कामात गैरप्रकार झाल्याची तक्रार १४ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेकडे केली होती. या तक्रारीमध्ये जाधव यांनी नमूद केले होते की, विकास कामांच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाली. निविदाची मर्यादा १५ दिवस ठेवणे बंधनकारक असताना केवळ सात दिवस ठेवण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले होते. सदर प्रकार इतक्यावरच न थांबता ज्यादिवशी ई निविदा उघडण्यात आली, त्यादिवशी सदर कंत्राटदारास धनादेशाद्वारे रक्कम अदा करण्यात आली. एकाच दिवसात निविदा उघडून कंपनीने २६ लाखाचे काम करणे हे शक्य नसल्याचे तक्रारकर्त्यांनी तक्रारीत म्हटले होते. त्यांच्या तक्रारीवरून प्रशासनाने २८ जानेवारी रोजी ग्रामपंचायतचे रेकॉर्ड ताब्यात घेऊन चौकशी केली. यामध्ये एकाच दिवशी निविदा उघडून त्याच दिवशी कंत्राटदाराला काही रकमेचा धनादेश दिल्याचे सिद्ध झाल्याचा अहवाल पंचायत विभागाच्या विस्तार अधिकाºयांमार्फत तक्रारकर्त्यांना प्राप्त झाला आहे. या अहवालात सरपंच, सचिव व अभियंता यांनी या कामात अनिमितता केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या चौकशी अहवालावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे ३ मार्च रोजी निर्णय घेणार होते. मात्र आता ही सुनावणी १५ मार्चपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे या प्रकरणावर १५ मार्च किंवा त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे शिरपूरसह तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.
या प्रकरणाची चौकशी विस्तार अधिकाºयांमार्फत पूर्ण झाली आहे. यामध्ये सरपंच, सचिव व अभियंता यांनी अनियमितता केली असल्याचा अहवाल चौकशी अधिकाºयांनी दिला आहे. मात्र यावर अजूनही निर्णय देण्यात आला नाही. लवकर निर्णय मिळणार नसेल पर याप्रकरणी आम्ही न्यायालयात जावू.
-सुशांत जाधव
माजी सरपंच शिरपूर जैन