वाशिम जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायतींची २४ मार्चला सार्वत्रिक निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 04:05 PM2019-02-22T16:05:26+5:302019-02-22T16:05:32+5:30
वाशिम : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार येत्या २४ मार्च रोजी जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील ३२ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम तसेच ६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांसाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार येत्या २४ मार्च रोजी जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील ३२ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम तसेच ६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांसाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, सार्वत्रिक व पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यत अस्तित्वात राहणार आहे. या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आचारसंहिता कालावधीत कुठे करता येणार नाही, असे राज्य निवडणूक आयोगाने सूचित केले आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार सार्वत्रिक निवडणूक व पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र ५ ते ९ मार्च २०१९ या कालावधीत स्वीकारले जाणार आहेत. नामनिर्देशनपत्रांची छाननी ११ मार्च २०१९ रोजी होईल. १३ मार्च रोजी नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. त्याचदिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल व अंतिमरीत्या निवडणूक लढविणाºया उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. आवश्यकता असल्यास २४ मार्च २०१९ रोजी मतदान घेण्यात येईल. मतमोजणी २५ मार्च रोजी होईल व २८ मार्च २०१९ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल, असे कळविण्यात आले.
सार्वत्रिक निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायती
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार वाशिम तालुक्यातील एकांबा, अडगाव खु., देवठाणा बु., जांभरुण नावजी, वांगी, सोयता, रिसोड तालुक्यातील भरजहांगीर, मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे, खडकी इजारा, कुत्तरडोह, मुसळवाडी, अमाना, मंगरूळपीर तालुक्यातील मंगळसा, लाठी, चिखली, तपोवन, बिटोडा, इचोरी, मानोरा तालुक्यातील बोरव्हा, चौसाळा, दापुरा बु. दापुरा खु., ढोणी, फुलउमरी, गिरोली, जामदरा घोटी, काली, कोलार, पाळोदी, सोमेश्वरनगर, उमरी बु., उमरी खु. या ३२ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे.
थेट सरपंच निवडीसाठी पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती
जिल्ह्यातील ६ ग्रामपंचातींमधील सरपंचपदाच्या रिक्त जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यात वाशिम तालुक्यातील गोंडेगाव, रिसोड तालुक्यातील घोन्सर, मोरगव्हाण, मंगरूळपीर तालुक्यातील वसंतवाडी, मानोरा तालुक्यातील खांबाळा, कारंजा तालुक्यातील झोडगा बु. या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.