मणिपूर घटनेच्या निषेधार्थ वाशिमात मोर्चा
By दिनेश पठाडे | Published: July 26, 2023 03:10 PM2023-07-26T15:10:13+5:302023-07-26T15:10:24+5:30
शहरातील क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव स्मारक परिसरातून मोर्चाला सुरुवात करण्यात आली.
वाशिम : मणिपूर राज्यातील महिला अत्याचाराच्या निषेधार्थ बुधवारी वाशिम शहरात समविचारी संघटनांनी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. समनक जनता पार्टी, गोरसेना, गोरसीकवाडी जिल्हा वाशिम, नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, वाशिम आदी समविचारी संघटनाच्या वतीने २६ जुलैला धिकार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव स्मारक परिसरातून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सभा घेऊन मोर्चाचा समारोप करण्यात आला. यावेळी मणिपूर व केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. मणिपूरमध्ये अत्याचार करणाऱ्यांना व महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या गुन्हेगारांना तेथील सरकारने शासन न केल्यामुळे गुन्हेगारांचे धैर्य वाढले आहे.
केंद्र व राज्य सरकारचा निषेध करतानाच मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, दोषींना कडक शिक्षा द्यावी, मणिपूर मधील घटनेने देशाची जगात नाचक्की झाली आहे. त्यामुळे या घटनांची गांभीर्याने नोंद घेऊन निःपक्षपाती कारवाई करुन गुन्हेगाराना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होतो.