प्रकल्पग्रस्तांच्या मागणीसाठी बळीराजा प्रकल्प संघर्ष समितीचा वाशिमात माेर्चा
By नंदकिशोर नारे | Published: July 3, 2024 03:14 PM2024-07-03T15:14:07+5:302024-07-03T15:14:19+5:30
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मोर्चाची सुरुवात सकाळी ११ वाजता शिवाजी चौक वाशिम येथून करण्यात आली.
नंदकिशोर नारे
वाशिम : बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती वाशिम तथा विदर्भ संघटनेच्या वतीने प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याच्या दृष्टीने बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष तथा विभागीय कार्याध्यक्ष माणिकराव गंगावणे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली ३ जुलै राेजी वाशिम येथे मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष शिवदास ताठे बाबूसिंग पवार, भाऊसिंग राठोड, शिवाजी घुगे, मुक्तार पटेल, नंदकिशोर कांबळे, संजय भदरुक इत्यादी जिल्हा पदाधिकारी यांच्यासह वाशिम, अकोला, यवतमाळ जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त महिला-पुरुष सहभागी झाले होते. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मोर्चाची सुरुवात सकाळी ११ वाजता शिवाजी चौक वाशिम येथून करण्यात आली. हा मोर्चा येथून पाटणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, बस स्टॅण्ड, ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाऊन तेथे सर्वांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शहरातून निघालेल्या या माेर्चाने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले हाेते. काेणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पाेलिसांनी चाेख बंदाेबस्त ठेवला हाेता. शांततेत माेर्चा काढण्यात आला.
प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या असून त्यामधील प्रमुख दोन मागण्या म्हणजे सन २००६ ते डिसेंबर २०१३ या कालावधीत सरळ खरेदीधारक शेतकऱ्यांना सन २०१३ च्या कायद्यानुसार वाढीव मोबदला मिळण्याबाबत, तर दुसरी मागणी ५ टक्क्यांहून आरक्षण १५ टक्के करण्यात यावे. तसेच महाराष्ट्र पुनर्वसन कायद्याप्रमाणे विस्थापित कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घेणे किंवा शासकीय नोकरी शक्य न झाल्यास एक रक्कमी २० लक्ष रुपये देण्यात यावे.