वीकेंडला बाजारपेठ कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:25 AM2021-07-05T04:25:46+5:302021-07-05T04:25:46+5:30
................ कोरोना चाचण्यांचे प्रमाण घटले वाशिम : गेल्या काही दिवसांपासून कोरोना चाचण्यांचे प्रमाण घटले आहे. विशेष आनंदाची बाब म्हणजे ...
................
कोरोना चाचण्यांचे प्रमाण घटले
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून कोरोना चाचण्यांचे प्रमाण घटले आहे. विशेष आनंदाची बाब म्हणजे होत असलेल्या चाचण्यांमधून बाधित आढळणाऱ्यांचे प्रमाणही नगण्य आहे. यावरून जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसत आहे.
....................
पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची मागणी
वाशिम : कोरोनाचे संकट आता बहुतांशी निवळले आहे. यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली पॅसेंजर रेल्वे पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. एसटीचा प्रवास महागला असून तो परवडत नसल्याचा सूर उमटत आहे.
................
बाॅटलमध्ये पेट्रोल मिळण्यासाठी वाद
वाशिम : पोलीस विभागाच्या आदेशावरून जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोलपंप चालकांकडून बाॅटलमध्ये पेट्रोल देणे बंद करण्यात आले आहे. असे असताना काही ग्राहक बाॅटलमध्ये पेट्रोल मिळण्यासाठी वाद घालत असल्याचे दिसून येत आहे.
...............
पानटपऱ्यांवर पोलिसांचा विशेष वाॅच
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून गुटखाविक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस विभागाने धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुषंगाने वाशिम शहरातील पानटपऱ्यांवरही विशेष वाॅच ठेवला जात आहे.
...................
पावसाअभावी पिके संकटात
जऊळका रेल्वे : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असतानाही पावसाने दीर्घ दडी मारली आहे. यामुळे खरीप हंगामातील विविध पीके संकटात सापडली असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
..................
सर्दी, खोकल्याने लहान मुले त्रस्त
वाशिम : सकाळपासून रात्री उशिरापर्यंत वातावरणात उष्णता कायम राहत आहे. या प्रतिकूल परिस्थितीमुळे विशेषत: लहान मुलांना सर्दी, खोकला आणि तापाच्या आजाराने ग्रासले असून ते त्रस्त झाले आहेत.
....................
वन्यप्राण्यांकडून कोवळ्या पिकांचे नुकसान
वाशिम : सध्या सिंचनाची सुविधा असलेल्या जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या शेतातील पिके तरारली आहेत; मात्र वन्यप्राण्यांकडून कोवळ्या पिकांचे नुकसान केले जात आहे. या समस्येमुळे शेतकरी वैतागले आहेत.
...................
भूईमुगाला मिळेना अपेक्षित दर
वाशिम : जिल्ह्यात यंदा उन्हाळी भूईमुगाच्या एकरी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. दुसरीकडे हाती आलेल्या मालाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची फसगत झाली आहे. दरवाढ होण्याची अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत.
..................
मानोरा शहरात आढळले दोन बाधित रुग्ण
मानोरा : शहरात २ व ३ जुलै रोजी कोरोना संसर्गाने बाधित एकही रुग्ण निष्पन्न झाला नाही. ४ जुलै रोजी मात्र शहरात दोन बाधित रुग्ण आढळून आले. तालुक्यातील गावे आज निरंक राहिली.
..............
रस्त्याची दुरवस्था, नागरिक त्रस्त
वाशिम : पुसद नाका येथून मन्नासिंग चाैकाकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने विशेषत: वाहनचालक पुरते वैतागले आहेत. रस्त्याची किमान डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे.
..................
मास्क विक्रीचे प्रमाण घटले
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या घटलेली आहे. यामुळे नागरिक बिनधास्त झाले असून मास्क विक्रीच्या प्रमाणातही घट झाल्याचे दिसून येत आहे. यासंबंधीची कारवाईदेखील थंडावली आहे.