बाजार समिती निवडणूक; १३ अर्ज दाखल
By admin | Published: June 15, 2016 02:02 AM2016-06-15T02:02:19+5:302016-06-15T02:02:19+5:30
मालेगावात मोर्चेबांधणी, ३१ जुलै रोजी निवडणूक
मालेगाव (जि. वाशिम) : कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगावच्या निवडणुकीत १३ जूनपर्यंत १0 उमेदवारी अर्ज दाखल होते. १४ जून रोजी तीन अर्ज आल्याने एकूण १३ उमेदवारी अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगावच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपत असल्याने येत्या ३१ जुलै रोजी ही निवडणूक होणार आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे बाजार समितीच्या संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यात आली होती, तसेच मतदार याद्यामध्ये बोगस मतदार असल्याच्या आक्षेपामुळे ही निवडणूक लांबली होती. आता निवडणूक तारीख निश्चित झाली असून, उमेदवार अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. १७ जूनपर्यंत उमेदवार अर्ज स्वीकारले जाणार आहेत. १३ जुलै रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे आणि ३१ जुलै रोजी मतदान व १ ऑगस्ट रोजी मतमोजणी असा निवडणूक कार्यक्रम आहे. या निवडणुकीत काँग्रेसतर्फे आमदार अमित झनक, युवा नेते नकुल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप जाधव, गणेश उंडाळ, भाजपाकडून माजी आमदार विजयराव जाधव, गोपाल पाटील राऊत, शिवसेनेकडून संतोष जोशी, संतोष सुरडकर, शिवसंग्रामतर्फे श्याम काबरा, चंदू जाधव, दिलीप गट्टानी, मनसेतर्फे अशोक अंभोरे आदी दिग्गज मंडळी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविणार असल्याची चर्चा आहे. १४ जूनपर्यंत एकूण १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.