बाजार समितीच्या कर्मचा-यावर हल्ला
By admin | Published: June 24, 2015 01:47 AM2015-06-24T01:47:30+5:302015-06-24T01:47:30+5:30
कर्मचा-याची प्रकृती चिंताजनक.
मानोरा : येथील कृषिउत्पन्न बाजार समितीचे हंगामी कर्मचारी विजय राठोड यांच्यावर भास्कर कांबळे याने २३ जूनला सायंकाळी ५.३0 वाजताच्या सुमारास चाकूने पोटावर प्राणघातक हल्ला करून तेथून पसार झाला. कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये विजय रायसिंह राठोड हा हंगामी पहारेकरी म्हणून कामाला आहे. नेहमीप्रमाणे तो २३ जूनला सायंकाळी ५ वाजता बाजार समितीच्या गेटजवळील ओट्यावर बसून असताना भास्कर कांबळे हा ५.३0 च्या सुमारास आला व त्याने विजय राठोड यांच्या पोटावर चाकूने हल्ला केला. चाकू त्याच्या पोटाच्या डाव्या बाजूला लागल्याने गंभीर दुखापत झाली. त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले व पोलिसांना घटनेची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी नांदे यांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक डाखोरे व इंगळे ग्रामीण रुग्णालयात विजय राठोड यांचे बयान घेतले. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे डॉ. नांदे यांनी पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे पाठविले आहे. विशेष म्हणजे, विजय राठोड यांनी तीन महिन्यांअगोदर मानोरा पोलीस ठाण्यात भास्कर कांबळे हा जिवे मारण्याची धमकी देतो तसेच चाकू हातात घेवून बाजार समिती परिसरात फिरत असल्याची लेखी फिर्याद दिली होती. त्याच्यापासून जिवाला धोका असल्याने त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली होती. पोलीसांनी मात्र त्यावेळी दखल न घेतल्याने कांबळे याचे मनोबल वाढले. त्यामुळे अशी घटना घडली, असा आरोप बाजार समितीचे कर्मचारी करीत आहेत. वृत्त लिहीस्तोवर या प्रकरणी कोणत्याच प्रकारची गुन्ह्याची नोंद पोलिसांत करण्यात आली नव्हती.