‘मार्च एण्डिंग’च्या नावाखाली बाजार समित्या बंद!

By admin | Published: March 31, 2017 02:28 AM2017-03-31T02:28:46+5:302017-03-31T02:28:46+5:30

शेतकरी अडचणीत; बहुतेक ठिकाणी ५ एप्रिलपासून होणार खरेदी

Market committees closed in the name of 'March Ending' | ‘मार्च एण्डिंग’च्या नावाखाली बाजार समित्या बंद!

‘मार्च एण्डिंग’च्या नावाखाली बाजार समित्या बंद!

Next

वाशिम, दि. ३0- विविध नैसर्गिक संकटे, बाजारातील दराची घसरण आदी अनेक अडचणींचा सामना जिल्ह्यातील शेतकरी करीत असतानाच मार्च एण्डिंगच्या ताळेबंदासाठी बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्याने जिल्हाभरातील शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत.
मार्च महिन्यात आर्थिक वर्षे संपत असल्याने वर्षभराच्या खात्याची जुळवाजुळव करण्यासाठी व्यापार्‍यांची धडपड सुरू असते. एक एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत बहुतेक सर्वच आर्थिक व्यवहार केले जातात. ३१ मार्च अर्थात आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस. शासकीय, निमशासकीय, व्यापारी, उद्योजक, सार्‍यांचीच ह्यमार्च क्लोजिंगसाठी धडपड सुरू आहे. आपले सर्व व्यवहार पूर्ण करून नव्या वर्षातील नव्या व्यवहाराची तयारी प्रत्येकाकडून केली जाते. व्यापारी उद्योजकांनाही मावळत्या आर्थिक वर्षाचा ताळेबंद जुळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. सद्यस्थितीत जिल्ह्यातील व्यापारी मार्च एण्डिंगच्या कामात गुंतले असून, याच कारणामुळे त्यांनी बाजार समित्या बंद ठेवण्याची मागणी बाजार समित्यांकडे केली आहे. जिल्ह्यातील मालेगाव वगळता बहुतेक सर्वच बाजार समित्यांमधील खरेदी बंद करण्यात आली असून, काही ठिकाणी चार ते पाच दिवसांपासून तर काही ठिकाणी मागील दोन दिवसांपासून शेतमालाच्या खरेदीचे व्यवहार बंद करण्यात आले आहेत. यामुळे शेतकरी वर्गाची मात्र मोठी पंचाईत झाली आहे. वाशिम येथील बाजार समितीमधील खरेदी बुधवार, २९ मार्चपासून बंद करण्यात आली असून, येत्या ५ एप्रिलपर्यंत येथील व्यवहार बंद ठेवण्यात येणार असल्याचे संबंधितांनी सांगितले, तर कारंजा येथील बाजार समिती आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय मंगळवार, २८ मार्च रोजी घेण्यात आला. रिसोड येथील बाजार समितीचे व्यवहारही मार्च एण्डिंगसाठी बंद ठेवण्यात आले असून, मंगरुळपीर येथील बाजार समिती मागील चार दिवसांपासून बंद ठेवण्यात आली आहे. येथील व्यवहारही ६ एप्रिल पासून पुन्हा सुरू होणार आहेत. आता व्यापार्‍यांनी त्यांच्या ताळेबंदासाठी बाजार समित्यांकडे खरेदीचे व्यवहार बंद ठेवण्याची मागणी केली असल्याने बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या. यामुळे शेतकरी मोठय़ा आर्थिक अडचणीत सापडला आहे.

मार्च एण्डिंगमुळे ताळेबंद जुळविण्यासाठी वेळ लागणार असल्याने खरेदीवर लक्ष देता येणार नाही, तसेच खरेदीसाठी बँकांकडून पुरेसा पैसाही मिळत नसल्याने व्यापार्‍यांनी बाजार समित्या सोमवारपर्यंत बंद ठेवण्याची मागणी केली होती. त्यानुसार बाजार समितीमधील खरेदी बंद ठेवण्यात आली आहे
- नीलेश भाकरे
सचिव, बाजार समिती, कारंजा

मार्च एण्डिंगच्या काळात दरवर्षीच बाजार समित्या बंद ठेवण्यात येतात. यंदाही ताळेबंद जुळविण्यासाठी बाजार समितीमधील खरेदीचे व्यवहार बंद ठेवण्याची मागणी व्यापार्‍यांनी केली होती. त्यानुसार बाजार समिती बंद ठेवली आहे. तथापि, शेतकर्‍यांना याबाबत पूर्वीच सूचना देण्यात आली होती.
- बबन इंगळे
सचिव, कृषी उत्पन्न बाजार
समिती, वाशिम

चिल्लर व्यापार्‍यांची चांदी
बाजार समित्यांमध्ये लिलावात क मी अधिक दर मिळतील; परंतु आता बाजार समित्या बंद असल्याने गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना चिल्लर व्यापार्‍यांकडे मिळेल, त्या दरात शेतमाल विकावा लागत आहे. रस्त्यावर फडी लावून शेतमाल खरेदी करणार्‍यांची यामुळे मोठी चांदी झाली आहे. अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांकडून दोन हजार ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटल दराने ते तुरीची खरेदी करीत आहेत. शेतकरी मात्र नुकसान होत असतानाही अडचणीपोटी या व्यापार्‍यांकडे निमुटपणे माल मोजून देण्यापलिकडे काहीच करू शकत नाहीत

Web Title: Market committees closed in the name of 'March Ending'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.