आजपासून सुरू होणार जिल्हय़ातील बाजार समित्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:51 AM2017-10-23T00:51:04+5:302017-10-23T00:51:43+5:30
वाशिम: दिवाळी सणादरम्यान १८ ते २२ ऑक्टोबर असे सलग पाच दिवस बंद असलेल्या जिल्हय़ातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या सोमवार, २३ ऑक्टोबरपासून पूर्ववत होणार आहेत. दरम्यान, गत पाच दिवसांत जिल्हय़ातील शेकडो शेतकर्यांना मातीमोल भावात शेतमालाची विक्री करावी लागली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: दिवाळी सणादरम्यान १८ ते २२ ऑक्टोबर असे सलग पाच दिवस बंद असलेल्या जिल्हय़ातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या सोमवार, २३ ऑक्टोबरपासून पूर्ववत होणार आहेत. दरम्यान, गत पाच दिवसांत जिल्हय़ातील शेकडो शेतकर्यांना मातीमोल भावात शेतमालाची विक्री करावी लागली.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकर्यांना नानाविध समस्या, गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. यंदाचे वर्ष हे शेतकर्यांच्या दृष्टीने सर्वच बाजूंनी निराशाजनक ठरले असून गतवर्षी विक्री केलेल्या सोयाबीनचे प्रतिक्विंटल २00 रुपये प्रोत्साहनपर अनुदान अद्याप मिळालेले नाही. अनुदान मिळण्याची मागणी विविध पक्ष व संघटनांनी शासनस्तरावर केलेली आहे; मात्र अद्यापही यावर तोडगा निघाला नाही. नाफेडमार्फत तुरीची हमीदराने खरेदी करण्यात आली; परंतु त्यातही विविध स्वरूपातील अडचणींचा शेतकर्यांना सामना करावा लागला. खरीप हंगामातही सुरुवातीपासूनच पर्जन्यमानाचे प्रमाण कमी राहिल्याने हंगामातील प्रमुख पीक म्हणून ओळखल्या जाणार्या सोयाबिनची पार दाणादाण उडाली. नैसर्गिक आणि बहुतांशी मानवनिर्मित या सर्व संकटांवर मात करीत शेतकर्यांनी सोयाबीनची सोंगणी केली आहे; परंतु सरासरी उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट झाली असून, झालेला लागवड खर्चदेखील वसूल होणे कठीण झाले आहे. आता सोयाबीनची विक्री करतानाही शेतकर्यांना विद्यमान व्यवस्थेपुढे हतबल होण्याची वेळ आली आहे. दिवाळीदरम्यान पाच दिवस कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होत्या. त्यामुळे शेतकर्यांना अल्प भावात खासगी व्यापार्यांना तूरीची विक्री करावी लागली. यामध्ये शेतकर्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले.
१८ ऑक्टोबरपासून २२ ऑक्टोबरपर्यंत बाजार समित्या बंद होत्या. २३ ऑक्टोबरपासून बाजार समित्या पूर्ववत होत आहे; मात्र हमीभावाने शेतमालाची खरेदी होण्याची शक्यता अल्प असल्याने शेतकर्यांच्या पदरी निराशा पडण्याचे संकेत आहेत. नाफेड खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी विविध पक्ष व शेतकरी संघटनांनी केलेली आहे. अद्यापही नाफेड खरेदी केंद्र सुरू होऊ शकले नाही.
-