पाेळ्यानिमित्त बैलांच्या साजाने सजली बाजारपेठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:43 AM2021-09-03T04:43:33+5:302021-09-03T04:43:33+5:30
वाशिम : सोमवार, ६ सप्टेंबर रोजी पोळा सण असून, यानिमित्ताने आवश्यक साहित्य खरेदीसाठी जिल्ह्यातील सर्वच ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये ...
वाशिम : सोमवार, ६ सप्टेंबर रोजी पोळा सण असून, यानिमित्ताने आवश्यक साहित्य खरेदीसाठी जिल्ह्यातील सर्वच ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाल्याचे चित्र रविवारी दिसून आले.
शेतशिवारांमध्ये अहोरात्र राबणारा, पूर्वापारपासून शेतकऱ्यांचा सच्चा साथी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण हर्षोल्लासात साजरा केला जातो. या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये यंदाही कमालीचा उत्साह दिसून येत आहे. काेराेनामुळे गत दाेन वर्षांपासून पाेळा सण साजरा करता आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
गावागावात सोमवारी भरणाऱ्या पोळ्यामध्ये आपलाच बैल उठून दिसावा, यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे बैलांचा साजशृंगार खरेदी करतात. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात. पोळ्याच्या दिवशी बैलांच्या पाठीवर सुरेख नक्षीकाम केलेली झूल (एक प्रकारचे चादरीसारखे आवरण), सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, मटाट्या (एक प्रकारचा शृंगार), गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी), पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे आदी साहित्य खरेदी केले जाते. याअनुषंगाने रविवारी वाशिम शहरासह जिल्ह्यातील मंगरूळपीर, मानोरा, कारंजा, रिसोड आणि मालेगाव आणि ग्रामीण भागातील बाजारपेठेतही साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची तोबा गर्दी झाल्याचे दिसून आले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा साहित्याचे दर माेठ्या प्रमाणात वाढल्याचे निदर्शनास आले.
----------
पूजेसाठी बैलाचा शाेध
शेतकऱ्यांकडील बैलांची संख्या कमी झाली आहे. ट्रॅक्टरने बैलाची जागा घेतल्याने पूजेसाठी सुद्धा बैल आपल्या घरी यावा याकरिता नागरिक अपेक्षा करीत आहेत.
- दशरथ वाटाणे, शेतकरी, वाशिम
गावांमध्ये बैलाची आजही पूजा
वर्षभर शेतकऱ्यांच्या कामासाठी राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजही ग्रामीण भागात बैलांची मनोभावे पूजा केली जाते.
- भागवत खानझोडे, जांभरुण परांडे