केनवड येथील बाजारपेठेत शुकशुकाट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:57 AM2021-02-26T04:57:20+5:302021-02-26T04:57:20+5:30
केनवड येथे मध्यंतरी कोरोना बाधितांची संख्या वाढली होती. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सप्टेंबर महिन्यात केनवड येथे बाजारपेठ ...
केनवड येथे मध्यंतरी कोरोना बाधितांची संख्या वाढली होती. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सप्टेंबर महिन्यात केनवड येथे बाजारपेठ दुपारी २ वाजता पर्यंतच सुरू ठेवण्यात आली होती. ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचा आलेख घसरला. गत १० दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू आहेत तसेच दुकाने उघडण्याची वेळही सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच ठेवण्यात आली आहे. कोरोनाचा धोका वाढल्याने नागरिकांनी बाजारपेठेत तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनासह आरोग्य विभागाने केले. या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकही बाजारपेठेत येण्याचे टाळत असल्याचे केनवड येथे दिसून येत आहे. सार्वजनिक ठिकाणी तसेच बाजारपेठेत शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. केनवड परिसरातही काही प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनासह आरोग्य विभागही सज्ज झाला आहे. प्रशासनाचे आवाहन नागरिकही सकारात्मक घेत असल्याने बाजारपेठेतील गर्दी टळल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी बाजारपेठेत किंवा सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, हात वारंवार धुवावे असे आवाहन स्थानिक प्रशासनासह आरोग्य विभागाने गुरूवारी केले.