मालेगाव शहरातील आठवडी बाजारच्या दिवशी जडवाहतूक ठरतेय डोकेदुखी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 02:47 PM2017-12-07T14:47:20+5:302017-12-07T14:50:54+5:30
मालेगाव (वाशिम): तालुक्याचे मुख्यालय असलेल्या मालेगाव शहरातील आठवडी बाजारच्या दिवशी जडवाहतूकीवर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ झाली असून जडवाहतूक एकप्रकारे डोकेदुखी ठरत असल्याचे दिसून येत आहे.
मंगळवार हा मालेगावचा आठवडी बाजारचा दिवस आहे. काही दिवसांपूर्वी पोलिस निरीक्षक सुरेश नाईकनवरे यांनी यादिवशी किमान बाजारपेठेतील रस्त्यांवरून जडवाहतूक होऊ नये, यासाठी कडक पावले उचलली होती. जडवाहतूकीस सक्तीने निर्बंध लादल्याने रहदारी देखील सुरळित झाली; परंतु चालू आठवड्यातील बाजारच्या दिवशी पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ झाल्याचे निदर्शनास आले. गंभीर बाब म्हणजे फळविक्रेत्यांच्या हातगाड्या देखील रस्त्यावरच उभ्या राहत असल्याने वाहतूक वारंवार विस्कळित होत आहे. ट्रक, ट्रॅक्टरसह इतर जडवाहने शक्य नसतानाही बाजारातील गर्दीतून वाट काढत असताना तासन्तास छोटी वाहने अडकून पडतात. यावर प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढून शहरांतर्गत जडवाहतूकीवर पुन्हा निर्बंध लावावे, अशी मागणी जोर धरत आहे.