शिथिलता मिळताच वाशिम जिल्ह्यात बाजारपेठा गजबजल्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 10:55 AM2020-05-23T10:55:32+5:302020-05-23T10:55:43+5:30
खरेदीसाठी वाशिमसह सर्वच शहरांतील बाजारपेठेत नागरिकांची गर्दी उसळली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ‘नॉन रेड झोन’मध्ये समावेश असलेल्या वाशिम जिल्ह्यात २२ मे पासून सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत सर्व दुकाने सुरु ठेवण्यास मुभा मिळाली. पहिल्याच दिवशी विविध वस्तू, साहित्याच्या खरेदीसाठी वाशिमसह सर्वच शहरांतील बाजारपेठेत नागरिकांची गर्दी उसळली.
राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढविण्यात आला. दरम्यान, अर्थचक्र थोड्याफार प्रमाणात पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न म्हणून राज्य शासनाने राज्यात रेड झोन व नॉन रेड झोनच्या अनुषंगाने सुधारित मार्गदर्शक सूचना २१ मे रोजी जारी केल्या. त्यानुसार जिल्ह्यात २२ मेपासून ‘लॉकडाऊन’च्या सुधारित मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी सुरू झाली. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाशिमसह जिल्ह्यातील सर्व शहरांतील बाजारपेठ गजबजली ६ होती. सकाळी ९ वाजतापासूनच वाशिम शहरातील पाटणी चौकस्थित बाजारपेठेत नागरिकांनी विविध वस्तू व साहित्याच्या खरेदीसाठी एकच गर्दी केल्याचे दिसून आले. फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन न करता दुकानात तसेच दुकानासमोर नागरिकांची गर्दी झाली होती. अनेकांनी मास्क किंवा रूमालचा वापरही केला नसल्याचे दिसून आले.
दरम्यान, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, खेळाची मैदाने, मोकळी मैदाने व्यायामासाठी व्यक्तींना खुली करण्यात आली असली तरी २२ मे रोजी सकाळी जिल्हा क्रीडा संकुल येथे ‘मॉर्निंग वॉक’साठी कुणी आल्याचे दिसून आले नाही.
दुकानांमध्ये एकाचवेळी पाचपेक्षा अधिक व्यक्ती
सर्व आस्थापनाधारक, दुकानदारांनी ग्राहकांमध्ये किमान ६ मीटरचे अंतर राहील याची दक्षता घ्यावी तसेच एकावेळी ५ पेक्षा जास्त ग्राहकांना आस्थापना अथवा दुकानात प्रवेश देवू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी मोडक यांनी २१ मे रोजी दिले होते. परंतू, दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून आली.
या सेवा पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार
सुरक्षेच्या उद्देशाशिवाय रेल्वेने सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतुकीवर बंधने राहतील. कोणत्याही रेल्वेने प्रवाशांची वाहतूक करता येणार नाही. सर्व शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग बंद राहतील. बस स्थानक, रेल्वे स्थानक येथील कॅन्टीन व्यवस्था सुरु राहील. रेस्टॉरंटला अन्नपदार्थ घरपोच करण्याची मुभा राहील. सर्व चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, जिम्नॅशियम, थिएटर, आॅडीटोरियम, सेमिनारचे ठिकाण, स्विमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क, बार, सर्व धार्मिक स्थळे अथवा पुजेची ठिकाणे सामान्य व्यक्तींसाठी बंद राहतील.
आस्थापनांसाठी परवानगीची गरज नाही
सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने, कृषि विषयक सर्व सेवा, बँक, खासगी बांधकामे, माल वाहतूक, शहरी व ग्रामीण भागातील उद्योग, ई-कॉमर्स सुविधा, खासगी आस्थापना, कुरीअर, पोस्टल सेवा, रेस्टॉरंटमधून होम डीलीव्हरी करण्यास परवानगी आहे. तसेच केशकर्तनालये, स्पा सुरू राहतील. यापुढे सर्व आस्थापना, प्रतिष्ठाने, सेवा इत्यादीसाठी परवानगीची अथवा पासेसची आवश्यकता राहणार नाही.