विवाहितेच्या छळप्रकरणी सासरच्या नऊ जणांविरुद्ध गुन्हे!
By admin | Published: June 13, 2017 01:20 AM2017-06-13T01:20:11+5:302017-06-13T01:20:11+5:30
मालेगाव येथील प्रकरण : पाच लाख रुपयांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव: नोकरीसाठी माहेरवरून पाच लाख रुपये आणण्यासाठी पती व सासरकडील मंडळींनी छळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विवाहितेने दाखल केलेल्या फिर्यादीवरून मालेगाव पोलिसांनी तिच्या सासरकडील नऊ जणांविरुद्ध सोमवारी विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत.
मालेगाव येथील मुंगसाजीनगरमध्ये माहेर असलेली अंकिता श्रीकृष्ण भेणे (वय २७ वर्षे) हिचे सासर हडको, नांदेड येथे आहे. अंकिताने मालेगाव पोलीस स्टेशनला दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की तिच्या सासरकडील मंडळी व पतीने नोकरीसाठी माहेरवरून पाच लाख रुपये घेऊन ये, नाहीतर तुला जीवानिशी मारून टाकू, अशी धमकी दिली. सतत मारहाण केली. अंकिताला एक वर्षाची मुलगी असून, ती सध्या सासरच्या त्रासामुळे मालेगाव येथे तिच्या वडिलांकडे वास्तव्याला आहे. वडिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, त्यांना अजून दोन अविवाहित मुली आहेत.
अंकिताचे डीएडपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले असून, वडिलांनी आपल्या इतर दोन मुलींनादेखील चांगले शिक्षण मिळावे, यासाठी धडपड चालविली आहे. अशा परिस्थितीमध्ये अंकिताच्या सासरच्या मंडळीची तिला होणारी मारहाण व छळामुळे हे कुटुंब प्रचंड दहशतीखाली होते.
अखेर सासरच्या जाचाला कंटाळून अंकिताने मालेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी तिचा पती श्रीकृष्ण भेणे, सासरे सुभाष भेणे, सासू, नणंद तसेच तिचा पती अशा एकूण नऊ जणांविरुद्ध कलम ४९८, ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ गजानन वाणी करीत आहेत.