विवाहितेचा छळ; सासरच्या चौघांविरूद्ध गुन्हा
By admin | Published: April 7, 2017 10:39 PM2017-04-07T22:39:42+5:302017-04-07T22:39:42+5:30
जऊळका रेल्वे- माहेरवरुन ५० हजार रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या चार जणांविरूद्ध जऊळका पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
जऊळका रेल्वे (वाशिम) : मुलगा होत नाही म्हणून व हॉटेल व्यवसायाकरिता माहेरवरुन ५० हजार रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या सासरच्या चार जणांविरूद्ध जऊळका पोलिसांनी विविध कलमान्वये ७ एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला.
जऊळका रेल्वे येथील २९ वर्षीय पिडीत महिलेचा विवाह मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथील भीमराव जामनिक यांच्याशी काही वर्षापूर्वी झाला. विवाहितेला दोन मुली असून, मुलगा नसल्यामुळे सासरची मंडळी शारीरिक व मानसिक छळ करीत होती. तसेच हॉटले व्यवसायासाठी माहेरवरून ५० हजार रुपये घेऊन येण्याचा तगादा लावला. मागणी मान्य होत नसल्याचे पाहून काही महिन्यांपूर्वी डाव्या पायावर चाकूने हल्लाही केला होता, असे पिडीत महिलेने फिर्यादीत म्हटले. याप्रकरणी सासरच्या मंडळीविरूद्ध गुन्हा दाखल व्हावा म्हणून पिडीतेने मालेगाव येथील न्यायालयात दाद मागितली. विद्यमान न्यायालयाच्या आदेशानुसार जऊळका रेल्वे पोलिसांनी ७ एप्रिल रोजी पती भीमराव जामनिक, सासरा अजाबराव जामनिक, सासू गुंफाबाई जामनिक व दिर अमोल जामनिक रा.लाखपुरी ता. मूर्र्तिजापूर यांच्याविरूद्ध विविध कलमान्वये गुुन्हा दखल केला. पुढील तपास ठाणेदार आर.जी.शेख यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार विलास ताजणे करीत आहेत.