विवाहितांचा छळ; १७ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 01:17 AM2017-07-20T01:17:16+5:302017-07-20T01:17:16+5:30
तीन वेगवेगळ्या घटना : पैशांच्या मागणीवरून मानसिक त्रास
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा/रिसोड : माहेरहून पैसे आणण्याच्या मागणीवरून मानसिक व शारीरिक छळ होत असल्याच्या तीन वेगवेगळ्या घटना मानोरा आणि रिसोड तालुक्यात घडल्या आहेत. याप्रकरणी मानोरा आणि रिसोड पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी १९ जुलै रोजी एकंदरीत १७ आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे.
यातील पहिली घटना गिरोली येथील असून, फिर्यादी महिला विमल पांडुरंग अंभोरे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की तिचा पती पांडुरंग श्रीराम अंभोरे, दीर महादेव श्रीराम अंभोरे, मनोज श्रीराम अंभोरे, कविता महादेव अंभोरे, सखाराम पवने, तुळसाबाई सखाराम पवणे (सर्व रा.गिरोली) यांनी माहेरवरून ५० हजार रुपये आणण्याचा तगादा लावून शारीरिक व मानसिक छळ केला व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मानोरा पोलिसांनी नमूद आरोपींविरुद्ध कलम ४९८ ‘अ’, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या घटनेत प्रिया सदाशिव सरोदे या महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की तिचा पती सदाशिव सरोदे, सासरे अजाबराव सरोदे, सासू प्रमिला सरोदे (सर्व रा.मांडवा, ता. दिग्रस, जि.यवतमाळ) यांनी माहेरहून ५० हजार रुपये आणण्याकरिता तगादा लावून शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी मानोरा पोलिसांनी नमूद आरोपींविरुद्ध कलम ४९८ ‘अ’, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास बिट जमादार प्रकाश भगत, गणेश कुरकुरे करीत आहेत. विवाहितेच्या छळाची तिसरी घटना रिसोड तालुक्यातील असून, तू दिसायला सुंदर नाही, मनासारखा हुंडा दिला नाही व किराणा दुकान उभारण्यासाठी ५० हजार रुपये आणण्याच्या मागणीसाठी सासरच्या मंडळींनी मानसिक, शारीरिक छळ केला तसेच जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार पार्वतीबाई बावरे या महिलेने रिसोड पोलिसांत दाखल केली. त्यावरून आसेगाव पेन येथील फिर्यादीचा पती हरिभाऊ बावरे, सासू राधा बावरे, सासरा भगवान बावरे, ननंद आशा कांबळे, सुनीता बांगरे, सुभाष कांबळे, भिकाजी बांगरे आदींविरुद्ध भादंविचे कलम ४९८, ५०४, ५०६ , ३४ ‘अ’ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.