शहीद अमोल गोरेंचे कुटूंब झाले करमुक्त! पत्नी वैशाली यांना 'विशेष अतिथी'चा दर्जा
By सुनील काकडे | Published: April 24, 2023 03:00 PM2023-04-24T15:00:36+5:302023-04-24T15:01:42+5:30
सोनखास ग्रा.पं.चा ठराव, हुतात्मा गाैरव समितीकडूनही प्रत्यक्ष सहकार्य
सुनील काकडे, वाशिम: देशाच्या सेवेत सर्वस्व अर्पण करणाऱ्या अमोल गोरे यांना काही दिवसांपूर्वी अरूणाचलमध्ये विरमरण आले. त्यांच्या पश्चात कुटूंबाची वाताहात होऊ नये, यासाठी प्रत्यक्ष मदत करणारे शेकडो हात पुढे सरसावले आहेत. सोनखास ग्रामपंचायतीने अमोलच्या कुटूंबाला कायमचे करमुक्त करण्यासह पत्नी वैशालीला जि.प. शाळांमध्ये होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात आजिवन विशेष अतिथीचा दर्जा बहाल केला; सामाजिक दायित्व पार पाडत गठीत झालेल्या हुतात्मा गाैरव समितीनेही या कुटूंबाला प्रत्यक्ष सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
शहरापासून काही अंतरावर असलेल्या सोनखास येथील रहिवाशी तथा भारतीय सैन्यदलात पॅराशूट कमांडो म्हणून कार्यरत अमोल गोरे हे अरूणाचलमध्ये कर्तव्यावर असताना शहीद झाले. घरातील कर्ता पुरूषच असा अचानक निघून गेल्याने कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, शहीद अमोल गोरे यांच्या पश्चात मुलांच्या शिक्षणाची व आई-वडिलांच्या आरोग्यविषयक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून हुतात्मा गौरव समिती स्थापन करण्यात आली. त्यानुसार, अमोल गोरे यांच्या मयूर आणि तेजस या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सुनील कदम आणि पंकज बाजड यांच्या शाळेने घेतली आहे.
पाठ्यपुस्तकांची जबाबदारी ॲड. प्रल्हाद बाजड व ॲड. गजानन पाटील यांनी उचलली. तसेच शालेय गणवेशाची जबाबदारी ज्ञानेश्वर वाघ यांनी घेतली आहे; तर आई-वडिलांच्या वैद्यकीय उपचाराची जबाबदारी इंडियन मेडिकल असोसिएशनने तसेच औषधी पुरविण्याची जबाबदारी केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनने घेतली आहे. या पुढाकाराप्रती हुतात्मा गाैरव समितीने सर्वच स्तरांतून काैतुक होत आहे. ज्या दानशूर व्यक्ती व संस्थांना शहीद अमोल गोरे यांच्या परिजनांना सहकार्य करायचे आहे, त्या सर्वांना हुतात्मा गौरव समितीमध्ये सामावून घेण्याचा मनोदय समितीचे मुख्य संयोजक प्रशांत देशमुख यांनी व्यक्त केला.