'सीमेवरील शहीद जवान सुनील धोपेंसोबत घातपात, फोन करुन वर्तवला होता धोका'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 08:29 PM2018-09-16T20:29:27+5:302018-09-16T20:32:03+5:30
कुटुंबीयांचा आरोप: सुनील धोपे यांनी फोन करून वर्तविला होता धोका
कारंजा लाड (वाशिम) : मेघालय राज्यातील सिलाँग येथे सीमा सुरक्षा दलात कार्यरत कारंजा येथील रहिवासी जवान सुनील विठ्ठलराव धोपे (३७) यांचा मृत्यू नसून, घातपातच असल्याचा आरोप धोपे कुटुंबीयांनी केला आहे. याबाबत १६ सप्टेंबर रोजी कारंजा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले आहे.
कर्तव्याच्या ठिकाणी कार्यरत असताना सुनील धोपे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे सहकाऱ्यांना १५ सप्टेंबर रोजी आढळून आले होते. उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणाची माहिती १५ सप्टेंबर रोजी बीएसएफ कॅम्पकडून धोपे कुटुंबीयांना देण्यात आली होती. दरम्यान, १७ सप्टेंबर रोजी त्यांचे पार्थिव कारंजा येथे आणले जाणार असून, अंतिम दर्शनानंतर शासकीस इतमामात अंतिम संस्कार होणार असल्याची माहिती कारंजाचे ठाणेदार राजेंद्र बोडखे यांनी दिली. गत १९ वर्षांपासून ते सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले व भाऊ असा आप्त परिवार आहे. १६ सप्टेंबर रोजी आमदार राजेंद्र पाटणी यांच्यासह आम आदमी पार्टीचे यवतमाळ संघटक वसंत ढोके, तहसीलदार आर.बी. भोसले, जि. प. सदस्य गजानन अमदाबादकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देत धोपे कुटुंबीयांचे सांत्वन केले.
सुनील धोपे यांचा मृत्यू नसून, हा घातपातच असल्याचा आरोप धोपे कुटुंबीयांनी केला. सुनील धोपे यांनी १४ सप्टेंबर रोजी फोन करून आपण तणावात असून, वरिष्ठांसह सहकाºयांकडून आपल्या जीवाला धोका असल्याची माहिती दिली होती. या फोन रेकॉर्डिंगच्या आधारे सुनील यांचा भाऊ ज्ञानेश्वर धोपे यांनी याप्रकरणी सीमा सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाºयांविरुद्ध कारंजा शहर पोलीस स्टेशनला १६ सप्टेंबर रोजी तक्रार देत सविस्तर चौकशीची मागणी केली. यावेळी आमदार राजेंद्र पाटणी, मनसेचे पदाधिकारी अमोल लुलेकर यांच्यासह शेकडो जणांची पोलीस स्टेशनमध्ये गर्दी झाली होती.
मुख्यमंत्र्यांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आश्वासन
१६ सप्टेंबर रोजी आमदार राजेंद्र पाटणी यांच्यासह मान्यवरांनी धोपे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी पाटणी यांनी जवान धोपे यांच्या भावाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीवरून बोलणे करून दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हा प्रकार गंभीर असून, याची निश्चितपणे उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे आश्वासन धोपे कुटुंबीयांना दिले.
बॉक्स..
१७ सप्टेंबरला कारंजा बंद
जवान सुनील धोपे यांचा मृत्यू नसून, घातपात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केल्यानंतर याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी होण्याकरिता सामाजिक संघटना व विविध राजकीय पक्षांच्यावतीने १७ सप्टेंबर रोजी कारंजा बंदचे आवाहन करण्यात आले.