मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगची सक्ती हवी, लॉकडाऊन नको !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:30 AM2021-02-22T04:30:41+5:302021-02-22T04:30:41+5:30
वाशिम: गेल्या काही दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागण्याची भीती निर्माण झाली ...
वाशिम: गेल्या काही दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांसह व्यावसायिकांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. आधीच्या लॉकडाऊनमधून अद्याप सर्व क्षेत्र पूर्णपणे सावरले नसतानाच पुन्हा लॉकडाऊन केल्यास व्यवसाय पूर्णपण कोलमडण्याची वेळ येण्याची भीती उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली असून, मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगसह इतर नियम कडक करावे, मात्र लॉकडाऊन नकोच, असे मत त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात मार्च २०२० पासून जवळपास सात महिने कठोर लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील सर्व उद्योग, धंदे बाजारपेठा बंद होत्या. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. अनलॉक झाल्यानंतरही बहुतांश गोष्टींवर निर्बंध होते. सम-विषमचा नियम होता. त्यामुळे व्यापाऱ्यांचे अर्थचक्र बिघडले, तर कुठे उद्योगधंदे बंद असल्याने सर्वसामान्यांवर उपासमारीची पाळी आली होती. नोव्हेंबर महिन्यापासून झालेल्या अनलॉकमुळे त्यापासून दिलासा मिळत असतानाच आता पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊन लागण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यात परिस्थिती पाहून लॉकडाऊन करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केल्याने व्यापार, उद्योग संघटनांत चिंतेचे वातावरण पसरले असून, शासनाने पूर्णत: लॉकडाऊन न करता मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगच्या पालनासह इतर नियम अधिक कडक करावेत; परंतु लॉकडाऊन करू नये, असे मत त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.
---------------------------
कोट: कोरोना नियंत्रणासाठी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडत आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन जनतेनेही आपले कर्तव्य समजून कोरोना नियंत्रणासाठी शिस्त पाळणे आवश्यक आहे. व्यापारी, उद्योजकांसह सर्व सामान्यांचे पूर्वीच्या लॉकडाऊनमुळे झालेले नुकसान पाहता निर्बंध कडक करावेत मात्र पुन्हा लॉकडाऊन करू नये.
-विशाल दिलिपकुमार मालपाणी
व्यावसायिक,
---------------------------
कोट: कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक कार्यक्रम, सभा यावर कडक निर्बंध घातले पाहिजेत. विविध सार्वजनिक कार्यक्रमांत होणाºया गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढण्यास मदत होते. त्यामुळे बेशिस्त नागरिकांवर कारवाई झाली पाहिजे. नियम कडक करणे आवश्यक आहे; परंतु लॉकडाऊन पुन्हा नकोच.
- जुगल किशोर कोठारी
उद्योजक
--------------------------
कोट: पूर्वीच्या लॉकडाऊनचे भीषण परिणाम सर्वसामान्यांसह उद्योग, व्यावसायिकांना सहन करावे लागले. काहींना, तर कर्ज काढून पुन्हा व्यवसाय सुरू करावा लागला. आठ महिने निर्बंधांचे पालन करून पुन्हा नव्याने सुरुवात करणाºयांसह सर्वसामान्यांना आता लॉकडाऊन परवडणारच नाही. हवे तर नियम अधिक कठोर करायला हवेत.
-आनंद चरखा,
अध्यक्ष, व्यापारी युवा मंडळ, वाशिम
-------
गर्दीवर नियंत्रणाअभावी धोका वाढतोय
जिल्ह्यात गेल्या आठवडाभरातच ३५८ जणांना कोरोना संसर्ग झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता आठ हजारांच्या घरात पोहोचली आहे. शहरासह ग्रामीण भागांतही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे धोका वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून कठोर निर्बंध लागू केले जात आहेत.
------
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह - ७६४८
अॅक्टिव्ह - ३८६