आरोग्य विभागाकडे मास्क, सॅनिटायझरचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 04:30 PM2020-04-12T16:30:38+5:302020-04-12T16:31:11+5:30
. प्रत्येक जिल्हास्तरावर जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांकडून या दोन्ही वस्तूंची मागणी वारंवार करण्यात येत आहे.
लोकमत न्युज नेटवर्क
वाशिम: कोरोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत असलेल्या आरोग्य विभागाकडेच त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी पुरेशा प्रमाणात मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध नाहीत. अमरावती विभागात हे चित्र दिसत आहे. सर्वेक्षणासाठी फिरत असलेल्या कर्मचाºयांना प्रामुख्याने ही समस्या जाणवत आहे. प्रत्येक जिल्हास्तरावरून जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाºयांमार्फत ही समस्या नियंत्रित करण्यासाठी वारंवार मास्क, सॅनिटायझरची खरेदी करण्यात येत आहे.
अमरावती जिल्ह्यातील यवतमाळ, बुलडाणा, अकोला आणि वाशिम या जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे रुग्ण आढळून आले आहेत. ही रुग्णसंख्या अधिक वाढू नये आणि परिस्थिती चिघळू नये म्हणून या चारही जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या जबाबदारीत वाढ झाली असून, चारही जिल्ह्यात तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. यासाठी आरोग्य कर्मचाºयांना घरोघर फिरावे लागत आहे. याच कारणामुळे त्यांच्याकडे पुरेशा प्रमाणात मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा आणि विभागीयस्तरावरून नियोजन करण्यात येत असले तरी, तपासणी होत असलेल्या लोकांची संख्या मोठी असल्याने मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा जाणवत आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांकडून या दोन्ही वस्तूंची मागणी वारंवार करण्यात येत आहे.
अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून आवश्यक प्रमाणात खरेदी करीत आहेत. यासाठी तालुकास्तरावरून आवश्यकतेनुसार मास्क आणि सॅनिटायझरची मागणीही नोंदविण्यात येत आहे.
- रियाझ फारुखी
आरोग्य उपसंचालक, अमरावती