संचारबंदीमुळे माठ विक्रेते अडचणीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:44 AM2021-04-28T04:44:14+5:302021-04-28T04:44:14+5:30
वाशिम : कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या संचारबंदीच्या नियमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू ...
वाशिम : कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या संचारबंदीच्या नियमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, याची झळ माठ विक्रेत्यांना बसत असल्याचे दिसून येते. रांजण, माठ आदी माल हा जागेवरच पडून आहे.
गतवर्षी साधारणत: मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जनजीवन प्रभावित होत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदीचे आदेश लागू आहेत. यामुळे लघू व्यावसायिक अडचणीत आल्याच्या प्रतिक्रिया व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहेत. कुंभार समाजबांधवांनी बनविलेल्या माठविक्रीचा मुख्य हंगाम हा उन्हाळ्यातील असतो. मार्च, एप्रिल व मे महिन्यात माठाची विक्री केली जाते. साधारणता ऑक्टोबरपासून माठ व रांजन बनविण्याच्या कामाला सुरुवात केली जाते. घरगुती माठापासून तर मोठे माठ व पाणपोईचे रांजण बनवीने व मार्च, एप्रिल, मे महिन्यात विक्री करणे हा मुख्य व्यवसाय असतो. गतवर्षीही कडक लॉकडाऊन असल्याने व्यवसायाला फटका बसला. आताही संचारबंदीचे सुधारीत आदेश असल्याने व्यवसायाला फटका बसत आहे. ग्राहकांनी पुन्हा या माठ विक्रेत्यांकडे पाठ फिरवली असल्याने, बनविलेला माल तसाच पडून असल्याचे चित्र वाशिम शहरात पाहावयास मिळत आहे. लागोपाठ दोन हंगाम हातातून गेल्याने उदरनिर्वाह कसा करावा, असा पेच माठ विक्रेत्यांसमोर निर्माण होत आहे.