मंगरुळपीर येथे ‘मी व माझी जबाबदारी’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:47 AM2021-08-17T04:47:35+5:302021-08-17T04:47:35+5:30
ध्यास संचालिका व पोलीसमित्र तालुकाध्यक्ष अश्विनी राम अवताडे यांच्या पुढाकारातून व नगराध्यक्षा डॉ. गझाला खान यांच्या सहकार्यातून ‘मी व ...
ध्यास संचालिका व पोलीसमित्र तालुकाध्यक्ष अश्विनी राम अवताडे यांच्या पुढाकारातून व नगराध्यक्षा डॉ. गझाला खान यांच्या सहकार्यातून ‘मी व माझी जबाबदारी’ मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. शहरात सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. विविध कारणांमुळे प्रदूषण वाढत आहे. त्यात महिला वापरत असलेल्या सॅनिटरी पॅडच्या कचऱ्याचाही समावेश आहे. वापरलेल्या पॅडची विल्हेवाट कशी लावायची किंवा यासाठी काही पर्याय उपलब्ध आहे का हे महिलांना माहीत नसल्यामुळे ते कचऱ्यासोबत किंवा इतर ठिकाणी उघड्यावर टाकले जातात. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. सॅनिटरी पॅडमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी अश्विनी औताडे यांनी नगरपालिकेसोबत चर्चा करून पॅडची विल्हेवाट योग्य प्रकारे लावण्यासाठी एक पर्याय उपलब्ध केला. यामध्ये कचरागाडीच्या मागे एक लाल रंगाची पेटी लावण्यात आली असून, सगळ्या महिलांनी जमा झालेले पॅड इतर किंवा कचरा गाडीत न टाकता गाडीचा मागचा लाल रंगाच्या बॉक्समध्ये टाकावे, असे आवाहन त्यांनी केले.
----------------
यशस्वितेसाठी नगराध्यक्षांचा पुढाकार
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी नगराध्यक्षा डॉ गझाला खान यांचे विशेष सहकार्य लाभत असून चंदा ठाकूर, छाया इंगळे, शिल्पा मांढरे, सरिता पुरोहित, मानवतकर, माया पवार, सीमा रघुवंशी, आरती रघुवंशी, शुभांगी भोजने आदी महिलासुद्धा ही मोहीम यशस्वी होण्यासाठी सहकार्य करत असल्याचे औताडे यांनी सांगितले. जिल्ह्यातील महिलांनी एक महिला म्हणून मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करावे व आपापल्या गावातही हा उपक्रम राबवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.