सरपंच, उपसरपंचांना तुटपुंजे मानधन; सदस्यांची चहापानावरच बोळवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:41 AM2021-02-16T04:41:58+5:302021-02-16T04:41:58+5:30
वाशिम जिल्ह्यात नुकतीच १६३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक पार पडली आणि सोमवारी त्यापैकी ७५ ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचांची निवडही झाली. पूर्वी ...
वाशिम जिल्ह्यात नुकतीच १६३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक पार पडली आणि सोमवारी त्यापैकी ७५ ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचांची निवडही झाली. पूर्वी ग्रामपंचायत सरपंचांना असलेल्या मानधनात राज्य शासनाने ३० जुलै २०१९ रोजी वाढ केली; परंतु ही वाढ तुटपुंजीच असताना ग्रामपंचायत सदस्यांना मात्र मानधन लागू करण्यात आलेच नाही. केवळ सभेचा मासिक ५०० रुपये भत्ता आणि चहापानावरच सदस्यांचा ग्रामपंचायतींच्या निर्णयासाठी वापर होत आहे. त्यात गटग्रामपंचायत अंतर्गत १० किलोमीटर अंतरावर असलेल्या गावांतून सभेला येण्यासाठी मिळणाऱ्या भत्त्यापेक्षा शिलकीचा खर्च करावा लागतो. त्यामुळे अनेक सदस्य सभेला उपस्थित राहण्यास इच्छुकही नसल्याचे चित्र यापूर्वीच दिसून आले असून, सरपंच, उपसरपंचांच्या मानधनात वाढ करण्यासह सदस्यांनाही मानधन लागू करण्याची मागणी सरपंच, उपसरपंचांसह सदस्यांकडून होत आहे.
--
कोट: ग्रामपंचायतच्या विविध निर्णयात सरपंच, उपसरपंचांसह सदस्यांचा महत्त्वाचा सहभाग असतो. आपली कामे सोडून सर्व मंडळी ग्रामविकासासाठी आयोजित सभांना उपस्थित राहतात. त्यामुळे शासनाकडून सदस्यांनाही मानधन लागू करण्यासह सरपंच, उपसरपंचांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घ्यावा.
-मनीषा रमेश अंभोरे,
सरपंच चिखली (15६ँ09)
-----------
कोट: ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकासात्मक निर्णय घेण्यासाठी सरपंच, उपसरपंचांसह सदस्यांना मासिक सभांना उपस्थित राहावे लागते. सभेत दिवसभर उपस्थित राहावे लागते. शेतकरी असल्यास त्यांनाही कामे सोडून यावे लागते. त्यामुळे सदस्यांना मानधन लागू करण्यासह सरपंच, उपसरपंचांच्या मानधनातही वाढ व्हायला हवी.
-साहेबराव तुमसरे
सरपंच, कामरगाव
--------
कोट: राज्य शासनाने २०१७ मध्ये सरपंच, उपसरपंचांच्या मानधनात वाढ करताना सदस्यांच्या भत्त्यात वाढ केली; परंतु ही वाढ तुटपुंजीच आहे. त्यात सदस्यांना मानधनच मिळत नाही. महत्त्वाची कामे टाकून सभांना उपस्थित राहणाऱ्या सदस्यांना हक्काचे मानधन मिळायलाच हवे, तर सरपंच, उपसरपंचांच्या मानधनातही वाढ करावी.
- राजकन्या अढागळे,
सरपंच, शिरपूर