नीट न देता मेडिकल प्रवेश; तज्ज्ञ, विद्यार्थ्यांना काय वाटते?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:51 AM2021-09-16T04:51:34+5:302021-09-16T04:51:34+5:30
वाशिम : नीट परीक्षा न देता मेडिकलला प्रवेश देण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला आहे. या निर्णयाबाबत जिल्ह्यातील विद्यार्थी, तज्ज्ञांची ...
वाशिम : नीट परीक्षा न देता मेडिकलला प्रवेश देण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला आहे. या निर्णयाबाबत जिल्ह्यातील विद्यार्थी, तज्ज्ञांची मते जाणून घेतली असता चाळणी परीक्षा आवश्यक असल्याचे काहींनी सांगितले, तर बारावीतील गुणवत्तेनुसार प्रवेश असावेत, असे मत काहींनी व्यक्त केले.
बारावीनंतर कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावयाचा यासाठी महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. वैद्यकीय प्रवेशासाठी राज्यात १२ सप्टेंबर रोजी नीट परीक्षा घेण्यात आली. केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेतील गुणानुक्रमानुसार शासकीय, खासगी वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश मिळतो. सर्व राज्यात नीट परीक्षा घेण्यात येते. दरम्यान, तामिळनाडू राज्यात नीट परीक्षेच्या १९ तास आधी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने तेथील राज्य सरकारने नीट परीक्षेतून विद्यार्थ्यांना सूट देणारे विधेयक संमत केले. याबाबत जिल्ह्यातील तज्ज्ञ, विद्यार्थ्यांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
......
काय आहे तामिळनाडू सरकारचा धक्कादायक निर्णय?
नीट परीक्षेतून राज्यातील विद्यार्थ्यांना सूट देणारे विधेयक तामिळनाडू राज्यातील विधानसभेत मांडले गेले आणि संमतही झाले. सरकारी व खासगी संस्थांमध्ये वैद्यकीय पदवीच्या जागांसाठी विद्यार्थ्यांना बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश दिले जातील.
-----------------------धक्कादायक निर्णय
वैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा आवश्यक आहे. कोणतेही दडपण न बाळगता विद्यार्थ्यांनी या चाळणी परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाणे अपेक्षित आहे.
- आकाश आहाळे, शिक्षणतज्ज्ञ
------------------------वैद्यकीय प्रवेशासाठी नीटसारखी परीक्षा असायला हवी. बारावीतील गुण आणि चाळणी परीक्षेतील गुण ग्राह्य धरून अंतिम निकाल असायला हवा.
- किशोर वाहणे, शिक्षणतज्ज्ञ
------------------------विद्यार्थ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया
वैद्यकीय प्रवेशासाठी नुकतीच नीट परीक्षा दिली आहे. बारावीतील गुणांना ५० टक्के आणि नीट परीक्षेतील गुणांना ५० टक्के असा मिळून वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश असावा.
- अजित मकासरे, विद्यार्थी
-------------------------नीट परीक्षेची काठिण्य पातळी अतिउच्च असल्याने काही विद्यार्थी या परीक्षेचा धसका घेतात. आत्मविश्वासाने विद्यार्थ्यांनी या परीक्षेला सामोरे जायला हवे.
- सचिन गोटे, विद्यार्थी