वैद्यकीय अधिकारी गुंतले स्वत:च्या व्यवसायात!
By Admin | Published: July 4, 2017 07:37 PM2017-07-04T19:37:25+5:302017-07-04T19:37:25+5:30
कार्यरत डॉक्टरांचीही कर्तव्याला "दांडी" : जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकार
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक केलेल्या अनेक डॉक्टरांनी सद्य:स्थितीत स्वत:चे टोलेजंग हॉस्पिटल उभे करून खासगीत वैद्यकीय व्यवसाय थाटला आहे. याशिवाय कार्यरत १४ वैद्यकीय अधिकाऱ्यांमधूनही अनेकांकडून अधूनमधून कर्तव्याला ह्यदांडीह्ण मारण्याचा प्रकार वाढीस लागल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे.
वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉ. विजय कानडे हे १८ आॅगस्ट १९९५ ला रुजू झाले, ते २००९ पासून गैरहजर आहेत. डॉ. शिवाजी सावळे हे देखील १६ सप्टेंबर २००६ पासून गैरहजर आहेत. डॉ. संतोष सारडा यांनी स्वेच्छानिवृत्ती पत्करली असून डॉ. गणेश कानडे हे १ नोव्हेंबर २०१३ पासून गैरहजर आहेत. डॉ. लिना राठोड यांनी १ मार्च २०१४ रोजी राजीनामा दिला, डॉ. कविता ठाकरे ह्या ४ मार्च २०१५ पासून गैरहजर आहेत. डॉ. मानाजी घुगे, डॉ. विद्या भरणे हे देखील नियुक्तीपासूनच गैरहजर आहेत. डॉ. राम बाजड, डॉ. कुणाल काळे यांनी राजीनामा दिला; तर डॉ. चंद्रकांत तम्मेवार, डॉ. आशिष बेदरकर, डॉ. मंजुषा आढाव, डॉ. शेख हुसून शेख, डॉ. स्नेहा बिल्लारी, डॉ. व्ही.एस.ढगे हे वैद्यकीय अधिकारी कुठलेही ठोस कारण न देता गैरहजर आहेत.
तथापि, मंजूर ३० पदांपैकी १६ वैद्यकीय अधिकारी आपल्या खासगी व्यवसायात गुंतले असून इतर १४ वैद्यकीय अधिकारी देखील सलग सेवा देण्याकामी कुचराई करित असल्याने अतिदक्षता विभाग, शुश्रृषा कक्ष, ट्रामा केअर युनिट, सी.टी.स्कॅन, अंधत्व नियंत्रण कार्यक्रम आदी सर्व घटकांवर परिणाम होत असून रुग्णसेवा देखील प्रभावित होत आहे.
कुठलेही ठोस कारण न दर्शविता गैरहजर राहणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमुळे रुग्णसेवेवर विपरित परिणाम जाणवत आहे. संदर्भातील सविस्तर अहवाल वेळोवेळी शासनाकडे सादर करण्यात आला असून रिक्त असलेली पदे भरण्याबाबत शासनाचे देखील निर्देश आहेत. त्यावर लवकरच कार्यवाही केली जाईल.
- डॉ.एन.बी.पटेल
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम