‘रेमडेसिविर’ इंजेक्शनप्रकरणी मेडिकलची झाडाझडती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:43 AM2021-05-08T04:43:15+5:302021-05-08T04:43:15+5:30
वाशिम : रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने गुरुवार, ६ ...
वाशिम : रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने गुरुवार, ६ मे पासून मेडिकलची झाडाझडती सुरू केली. आतापर्यंत सात मेडिकलची तपासणी केली असून, तीन जणांकडून खुलासा मागविण्यात आला.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना, त्या तुलनेत आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. मागणीच्या तुलनेत रेमडेसिविर व अन्य औषधांचा पुरवठा होत नाही. त्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांची धावाधाव सुरू आहे. दरम्यान, काही ठिकाणी रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होत असून, चढ्या दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. इंजेक्शनसंदर्भात कुणाचीही गैरसोय होऊ नये, इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये, चढ्या दराने विक्री होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने मेडिकलची तपासणी करण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासन विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार संबंधित कोविड रुग्णालयाशी संलग्न असलेल्या मेडिकलची झाडाझडती सुरू असून, आतापर्यंत सात मेडिकलची तपासणी करण्यात आली. यापुढेही तपासणी केली जाणार असून, गैरप्रकार आढळून आल्यास कुणाचीही गय केली जाणार नसल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
.....
बॉक्स
तीन जणांकडून खुलासा मागविला
रेमडेसिविर इंजेक्शन देण्यासंदर्भात काही मार्गदर्शक सूचना आहे. ‘एचआरसीटी’ स्कोर कमी असताना शक्यतोवर रेमडेसिविर इंजेक्शन देणे टाळावे, अशा सूचना दिलेल्या आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने तपासणी केली असता, तीन जणांनी ‘एचआरसीटी’ स्कोर कमी असताना रेमडेसिविर इंजेक्शन दिल्याचे समोर आले. यासंदर्भात खुलासा मागविण्यात आला असता, संबंधित रुग्णांना इतरही आजार असल्याने आणि ‘एचआरसीटी’ स्कोर वाढू नये म्हणून रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता असल्याने त्याचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
.....
बॉक्स
८३७९९२९४१५ या क्रमांकावर नोंदवावी तक्रार
जिल्ह्यात अगोदरच मागणीच्या तुलनेत कमी प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन मिळत आहेत. रेमडेसिविर इंजेक्शनचा कुणी अवैध साठा करून ठेवल्याचे किंवा चढ्यादराने विक्री केल्याचे निदर्शनात आल्यास तसेच अधिकृत वितरकांशिवाय कुणी रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करीत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी ८३७९९२९४१५ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.
..............
कोट बॉक्स
रेमडेसिविर इंजेक्शनप्रकरणी तपासणी करण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासन विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार तपासणी करण्यात येत आहे. सात मेडिकलची तपासणी केली असून, तीन जणांकडून खुलासा मागितला आहे.
- शैलेश हिंगे
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम
०००