जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांत सरासरी ३६ टक्के साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:26 AM2021-07-09T04:26:45+5:302021-07-09T04:26:45+5:30
पावसाळा सुरू होऊन सव्वा महिना उलटला तरी पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या १३१ लघु आणि तीन मध्यम प्रकल्पांच्या पातळीत फारशी ...
पावसाळा सुरू होऊन सव्वा महिना उलटला तरी पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या १३१ लघु आणि तीन मध्यम प्रकल्पांच्या पातळीत फारशी वाढ झालेली नाही. सर्व प्रकल्पांची मिळून सरासरी २४ टक्क्यांपर्यंतच पातळी आहे. त्यात मध्यम प्रकल्पांची स्थितीही फारशी चांगली नाही. वाशिम शहरासह तालुक्यातील काही गावच्या पाणीपुरवठा योजना असलेल्या एकबुर्जी प्रकल्पात ३२.६६, मालेगाव तालुक्यातील सोनल प्रकल्पांत ३२.९२, तर यवतमाळ पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या अडाण प्रकल्पात ४४.८५ टक्के उपयुक्त साठा आहे. अर्थात अडाण प्रकल्पाची पातळी ४४.८५ टक्के असली तरी एकबुर्जी आणि सोनल प्रकल्पाची पातळी फारशी समाधानकारक नाही. त्यामुळे पुढील काळात दमदार पाऊस न पडल्यास हे प्रकल्प अर्धवटच राहण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकही दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.
----------------
सुरुवातीलाच झाला अडाण प्रकल्पातून विसर्ग
वाशिम जिल्ह्यात जून महिन्याच्या पूर्वार्धात दमदार पाऊस पडला होता. त्यात मंगरूळपीर, मानोरा आणि कारंजा तालुक्यात १० ते १२ जूनदरम्यान जोरदार पाऊस पडल्याने अडाण प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडावे लागले होते. अर्थात प्रकल्प पूर्ण भरला नसला तरी, जून महिन्याच्या निर्धारित पातळीपेक्षा अधिक प्रमाणात जलसाठा वाढल्याने यवतमाळ पाटबंधारे विभागाला या प्रकल्पातून विसर्ग करावा लागला होता. त्यानंतर मात्र पावसाने दडीच मारली असून, बुधवार, दि. ७ जुलैच्या रात्री मानोरा, मंगरूळपीर तालुक्यात चांगला पाऊस पडला तरी या प्रकल्पाच्या पातळीत फारशी वाढ झाली नाही.
----------------
मध्यम प्रकल्पांची स्थिती
प्रकल्प - जलसाठा (टक्के)
अडाण - ४४.८५
सोनल - ३२.९२
एकबुर्जी - ३२.६६
---------------------------