मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्र अंधारात!
By admin | Published: September 2, 2015 02:21 AM2015-09-02T02:21:00+5:302015-09-02T02:21:00+5:30
वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष, आरोग्य केंद्रात लस व औषधांसाठी वातानुकूलीत व्यवस्था प्रभावित.
मेडशी (जि. वाशिम): वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षित धोरणामुळे मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्र वारंवार अंधारात राहत असून वीजपुरवठय़ाअभावी लस व औषध फ्रिजमध्ये ठेवणे अवघड होऊन बसले आहे. मेडशी प्राथमिक आरोग्य केद्रांतर्गत ७ उपकेंद्र व ३४ गावे येत असून, यामध्ये आदिवासीबहुल खेडी गावे येतात. मेडशी येथे प्रा.आ. केंद्र असल्यामुळे याठिकाणी रात्री-अपरात्री प्रसुती व अन्य आजारांसाठी रुग्ण मोठय़ा संख्येने येतात. प्रा.आ.केंद्राचा विद्युत पुरवठा केव्हाही खंडित होत असल्याने वैद्यकीय सेवा पुरविणे मोठय़ा जिकरीचे होत असून, मनस्ताप वाढत आहे. वीजपुरवठा खंडित होणे ही नित्याचीच बाब बनली आहे. याकडे वीज वितरणच्या जबाबदार अधिकार्यांचे दुर्लक्ष होत असल्याने याचा फटका रूग्णांना बसत आहे. याबाबत वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, अधीक्षक अभियंता आदींसोबत पत्र व्यवहार करुन प्रा.आ. केंद्रासाठी विद्युत पुरवठा ए.जी.फिडरवरुन गावठाण फिडरला जोडण्याची विनंतीवजा मागणी केली. दरम्यान अधीक्षक अभियंता उदय गाणार यांनी सुध्दा कार्यवाहीचे संबंधितांना पत्र दिले; परंतु अद्यापही हा प्रश्न सुटला नाही.