मेडशीत विजेचा लपंडाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:48 AM2021-08-18T04:48:45+5:302021-08-18T04:48:45+5:30
येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभाराने विजेचा लपंडाव सुरू असून, चक्क १७ महिन्यांपासून तंत्रज्ञ गायब असल्याने एका तंत्रज्ञावर संपूर्ण ...
येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभाराने विजेचा लपंडाव सुरू असून, चक्क १७ महिन्यांपासून तंत्रज्ञ गायब असल्याने एका तंत्रज्ञावर संपूर्ण भार पडला आहे. विजेचा लपंडावाचा खेळ सुरू असल्याने मात्र ग्रामस्थांच्या जिवावर बेतत आहे.
पावसाळ्याचे दिवस असल्याने रात्री-अपरात्री सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढला आहे. रात्रीच्या सुमारास येथील प्रसिद्ध महाराज पंजाबबाबा यांना राहत्या घरात सर्पदंश झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली तर इतर ५ स्त्रियांना सर्पदंश झाल्याने पुढील उपचारार्थ त्यांना अकोला येथे हलविण्यात आले. येथील कार्यरत तंत्रज्ञ गत १७ महिन्यांपासून मालेगाव उपविभागीय कार्यालयात काम करीत असून, पगार मात्र मेडशी येथून काढत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत ग्रामस्थांना माहिती मिळताच माजी उपसरपंच शेख रज्जाकभाई, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानदेव साठे, माजी अध्यक्ष शौकत पठाण, माजी तंटामुक्ती अध्यक्ष विनोद तायडे, सुभाष तायडे आदींनी उपविभागीय कार्यलयात धडक देऊन उपअभियंता जीवनानी यांना जाब विचारला. मेडशी येथे नियुक्तीवर असलेला तंत्रज्ञ गोरे यांना मालेगाव शहराच्या ठिकाणी काम करीत असल्याने त्यांना मेडशीला परत पाठविण्यात यावे. पावरहाऊसला रिले बसवावा, एबी स्विच त्वरित बसवावा, विजेचा लपंडाव बंद करण्याची मागणी एका शिष्टमंडळाने उपअभियंता जीवनानी यांच्याकडे केली, तसेच आंदोलनाचा इशारा दिला.
आंदाेलनाचा इशारा देताच उपभियंत्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून मेडशी येथे वानखडे नामक वरिष्ठ तंत्रज्ञ यांची नियुक्ती केली जाणार असून, गोरे नामक तंत्रज्ञाला मेडशी परत पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.