'पीएचसी'चे फायर ऑडीट केव्हा? सभागृहात सदस्य आक्रमक, स्थगिती वरूनही संताप
By संतोष वानखडे | Published: September 19, 2022 07:00 PM2022-09-19T19:00:30+5:302022-09-19T19:01:43+5:30
वाशिममध्ये पीएचसी'चे फायर ऑडीट केव्हा होणार यावरून सभागृहात सदस्य आक्रमक झाले.
वाशिम : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांचे मागील एका वर्षापासून फायर ऑडिट का नाही? असा संतप्त प्रश्न उपस्थित करीत जिल्हा परिषद सदस्यांनी सोमवारच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाला धारेवर धरले. नगर पालिकेच्या संबंधित एजन्सीकडून प्रस्तावाला मंजूरी मिळाली की लवकरच फायर ऑडीट केले जाईल, असे जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे व आरोग्य सभापती चक्रधर गोटे यांनी स्पष्ट करीत हा प्रश्न निकाली काढला.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात दुपारी १.३० वाजता सुरू झालेल्या सभेचे पिठासीन अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे होते. यावेळी मंचावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, उपाध्यक्ष डॉ. शाम गाभणे, सभापती सर्वश्री चक्रधर गोटे, सुरेश मापारी, वनिता देवरे, शोभा गावंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे यांची उपस्थिती होती. सभेच्या सुरूवातीला जनावराच्या लम्पी आजारावरील उपाययोजनेसंदर्भात सदस्यांनी प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे भरण्यात यावी, गावोगावी लसीकरण, लसीचा उपलब्ध साठा, गोठ्यांमध्ये फवारणी आदी विषयांवर चर्चा झाली.
ग्रामीण भागातील घरकुलासाठी शासनाकडून १.६० लाखांचे अनुदान देण्यात येते. घरकुलाचे मॉडेल बनविण्यासाठी वाशिम पंचायत समितीला २.६० लाख रुपयांचा खर्च आल्याने घरकुलाचे अनुदान वाढवून देण्यासंदर्भात ठराव घेऊन शासनाकडे पाठविण्याचा मुद्दाही पं.स. सभापती रेश्मा गायकवाड यांनी उपस्थित केला. यावर शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा ठराव सभागृहाने मंजूर केला. काटा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी निधी देण्याची मागणी संध्या विरेंद्र देशमुख यांनी लावून धरली.
जनसुविधा, तिर्थक्षेत्र, रस्ते, जलसंधारण व अन्य योजनेतील बाकी असलेले 'दायित्व' तातडीने देण्याची मागणी जि.प. सदस्य दिलीप देशमुख यांनी केली. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांचे मागील एका वर्षापासून फायर ऑडिट नाही, यावरूनही दिलीप देशमुख यांनी प्रश्न उपस्थित करून आरोग्य विभागाचे लक्ष वेधले. फायर ऑडीटसाठी नगर पालिकेच्या संबंधित विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे, हा प्रस्ताव मंजूर होताच फायर ऑडीट केले जाईल, असे जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे व आरोग्य सभापती चक्रधर गोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे यांनी स्पष्ट केले.