विहिरींच्या प्रलंबित कामावरून सदस्यांनी ‘बीडीओं’ना धारेवर धरले!
By संतोष वानखडे | Published: March 23, 2023 07:18 PM2023-03-23T19:18:23+5:302023-03-23T19:18:29+5:30
जिल्हा परिषदेच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात गुरूवारी दुपारी १ वाजता सर्वसाधारण सभेला सुरूवात झाली.
वाशिम : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सिंचन विहिरींची कामे प्रभावित झाली असून, याला गटविकास अधिकारी (बीडीओ) व त्यांची यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गुरूवारी (दि.२३) केला.
जिल्हा परिषदेच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात गुरूवारी दुपारी १ वाजता सर्वसाधारण सभेला सुरूवात झाली. सभेचे पिठासीन अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे होते. मंचावर उपाध्यक्ष चक्रधर गोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) वसुमना पंत, सभापती सर्वश्री सुरेश मापारी, अशोक डोंगरदिवे, वैभव सरनाईक, वैशाली प्रमोद लळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे उपस्थित होते. रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचा लाभ देण्यात येतो.
मात्र, प्रशासकीय कार्यवाही ठप्प असल्याने विहिरींपासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत असल्याचा मुद्दा जि.प. सदस्य दिलीप देशमुख, डाॅ. सुधीर कवर, आर.के. राठोड, पूजा अमोल भूतेकर, सुनील चंदनशीव, शाम बढे आदींनी उपस्थित केला. सिंचन विहिरींच्या कामात दिरंगाई करणाऱ्या गटविकास अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा सभागृहातून हलणार नाही, असा आक्रमक पवित्रा देशमुख यांनी घेतला. डाॅ. कवर, भुतेकर यांनीही आक्रमक भूमिका घेतली.
जि.प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनीदेखील सिंचन विहिरींच्या कामास दिरंगाई होणे ही बाब गंभीर असून, याप्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना सीईओ पंत यांना दिल्या. यावर लवकरच बिडीओं व संबंधितांची संयुक्त बैठक घेण्याचे निर्देश देत, रिसोड बीडीओंच्या दप्तर चौकशी आदेश दिले.