मंगरुळपीरमधील स्मारक जपतेय अण्णाभाऊ साठेंच्या स्मृती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:44 AM2017-07-18T00:44:50+5:302017-07-18T00:44:50+5:30
अण्णाभाऊ साठे स्मृती दिन: विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांतून प्रबोधन
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर: मातंग समाजाच्या उद्धारासाठी झटणारे तुकाराम भाऊराव ऊर्फ साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती जपण्याचे कार्य महत्त्वपूर्ण कार्य मंगरुळपीर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक गेल्या २२ वर्षांपासून करीत आहे. मंगळवार १८ जुलै रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त या ठिकाणी विशेष कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले आहे
वैयक्तिक दु:खांचा विचार न करता; आपले विचार, कार्य व प्रतिभा यांच्या साहाय्याने लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोकशाहीर. शाहीर अण्णाभाऊ साठे म्हणजे जातिभेदांमुळे, जातींच्या उतरंडीमुळे शिक्षणापासून, समग्र विकासापासून वंचित राहिलेल्या मातंग समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्त्व. अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. मातंग समाजासह, दलितांमधील शोषीत समाजाच्या व्यथा त्यांनी ताकदीने आपल्या लेखणीतून मांडल्या. अशा महान व्यक्तीमत्त्वाच्या स्मृती जपण्याचे कार्य मंगरुळपीर येथील अण्णाभाऊ साठे स्मारक करीत आहे. शहरातून जाणाऱ्या वाशिम मार्गावर शासकीय गोदाम परिसरात १९९५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त भगवानराव पिसोळे यांनी या स्मारकाची निर्मिती केली. या ठिकाणी विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करून अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजात रुजविण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. अण्णाभाऊ साठे स्मारक समिती या नावाने स्थापन करण्यात आलेली ही समिती गेल्या २२ वर्षांपासून आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती जपत आहे. या समितीकडून स्मारकाची देखरेख करण्यासह सौंदर्यीकरणाचे कामही करण्यात आले. यासाठी गंगाधर कांबळे, अनिक गायकवाड, गजानन गायकवाड, मधुकर खंडारे, सुनिल भोंगळ, राजू आवारे आदि मंडळीचे महत्त्वाचे योगदान आहे. मंगळवारी या समितीच्यावतीने अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.