विवाहितेचा हुंड्यासाठी मानसिक छळ
By Admin | Published: June 16, 2017 01:49 AM2017-06-16T01:49:35+5:302017-06-16T01:49:35+5:30
पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल : फुलउमरी येथील प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : माहेरवरून पैसे आणण्याचा तगादा लावत विवाहित महिलेस मारहाण, शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध १५ जून रोजी विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मानोरा तालुक्यातील भिलडोंगर येथील नीता नामदेव जाधव (वय २२, रा.फुलउमरी) हिचा विवाह रीतिरिवाजाप्रमाणे फुलउमरी येथील आनंदा बळीराम जाधव यांचा मुलगा नामदेव आनंदा जाधव यांच्यासोबत झाला. काही वर्षे संसार सुरळीत चालला. त्यानंतर नीताला मारहाण करुन माहेरवरुन पैसे आणण्यासाठी तगादा लावण्यात आला. नीताच्या माहेरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे पैशाची पूर्तता झाली नाही. त्यामुळे नीताला मारहाण करणे, शिवीगाळ करुन शारीरिक व मानसिक छळ करणे सुरूच राहिल्याने अखेर नीताने कंटाळून मानोरा पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी पती नामदेव जाधव, सासरे आनंदा जाधव, सासू सावित्री जाधव, दीर प्रवीण जाधव व प्रदीप जाधव यांच्याविरुद्ध कलम ३२३, ५०४, ४९८ ‘अ’ नुसार गुन्हे दाखल केले.