मनोरुग्णाचा पत्नीसह इतर चौघांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 12:38 PM2021-02-20T12:38:54+5:302021-02-20T12:39:10+5:30
Mentally ill person attacked his wife बालाजी उत्तम मापारी असे नाव असलेल्या या मनोरुग्णास पोलिसांनी जेरबंद करून त्याची नागपूरच्या रुग्णालयाकडे रवानगी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : तालुक्यातील अनसिंग पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या बोरी बु. येथे १८ फेब्रुवारी रोजी ४० वर्षीय मनोरुग्ण इसमाचे मानसिक संतुलन बिघडल्यानंतर त्याने प्रथम स्वत:च्या पत्नीवर विळ्याने हल्ला केला. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर त्यानंतर त्याने गावातील इतर चौघांवरही हल्ला करून त्यांना जखमी केले. बालाजी उत्तम मापारी असे नाव असलेल्या या मनोरुग्णास पोलिसांनी जेरबंद करून त्याची नागपूरच्या रुग्णालयाकडे रवानगी केली.
प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी पहाटे ५ वाजता बालाजी मापारी (वय ४० वर्षे) यांचे मानसिक संतुलन बिघडले. त्यांनी चक्क हातात विळा घेऊन पत्नी कांचन मापारी यांना मारहाण केली. त्यात कांचन जखमी झाल्या. त्यानंतर, गावातीलच राजरत्न कांबळे हा शेतातून घरी परत येत असताना त्याला बालाजीने मारहाण केली. यासह पांडुरंग मापारी यास शेतात जाऊन मारहाण केली.
संतोष मापारी आणि रमेश मापारी या दोघांनाही बालाजी मापारीने मारहाण करून जखमी केले. गावचे पोलीस पाटील विश्वनाथ मापारी यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर, पोलिसांनी गावात येऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले व बालाजी मापारीला ताब्यात घेऊन त्याची नागपूर येथील मानसिक रुग्णालयाकडे रवानगी केली.
गावात दहशत अन् पोलिसांनाही मारहाण
मानसिक संतुलन बिघडलेल्या बालाजी मापारी यांनी बोरी बु. येथे १८ जानेवारी रोजी अक्षरश: धुमाकूळ घातला. मिळेल त्याला मारहाण करण्याच्या प्रकारामुळे गावात दहशत निर्माण झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर गावकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र, यावेळी बालाजी मापारी यांनी पोलीस पथकातील दोघांनाही मारहाण केली. या प्रकाराची गाव परिसरात जोरदार चर्चा होती.