शासकीय तंत्रनिकेतन प्रवेशासाठी गुणवत्ता यादी जाहीर होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 06:11 PM2020-09-21T18:11:58+5:302020-09-21T18:12:15+5:30
२४ व २५ सप्टेंबर रोजी प्रथम व द्वितीय वर्षाची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहिर केली जाणार आहे.
वाशिम : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत केंद्रीय पद्धतीने शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून, वाशिम येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात २४ व २५ सप्टेंबर रोजी प्रथम व द्वितीय वर्षाची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहिर केली जाणार आहे.
तंत्रनिकेतनच्या विविध पदविका अभ्यासक्रमासाठी १० आॅगस्टपासून प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. प्रवेश प्रक्रियेत तंत्रनिकेतनच्या प्रथमवर्ष अभ्यासक्रमासाठी प्रवेश नोंदणीकरिता २१ सप्टेंबर व थेट द्वितीय वर्षासाठी २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. नवीन वेळापत्रकानुसार प्रथम वर्षाची तात्पुरती गुणवत्ता यादी २४ सप्टेंबर रोजी, तर थेट द्वितीय वर्षाची तात्पुरती गुणवत्ता यादी २५ सप्टेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे.
प्रथम वर्षाकरिता २५ ते २७ सप्टेंबर पर्यंत आवश्यक कागदपत्रे, राखीव जागेसाठी असलेली कागदपत्रे तसेच विद्यार्थ्यांच्या तक्रारी लक्षात घेवून दुरुस्त्या केल्या जातील. तसेच थेट द्वितीय वर्षाकरिता २६ ते २८ सप्टेंबर या कालावधीत दुरुस्त्या केल्या जातील. २९ सप्टेंबर रोजी प्रथम वर्षाची व ३० सप्टेंबर रोजी थेट द्वितीय वर्षाची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.