रोहयो घोटाळा; चौकशी अहवाल सादर करण्यात दिरंगाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 12:31 PM2020-02-11T12:31:26+5:302020-02-11T12:31:44+5:30
एकाही ग्रामपंचायतीचा चौकशी अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात असलेल्या ८६ ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमी योजनेंतर्गंत झालेल्या विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाली. याप्रकरणी विभागीय आयुक्तांच्या आदेशावरून डिसेंबर २०१९ या महिन्यात १० पथकांमार्फत चौकशी करण्यात आली; मात्र ४० दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटला असताना एकाही ग्रामपंचायतीचा चौकशी अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये अनियमिततता व गैरप्रकार झाल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्याची दखल घेऊन कामांची सखोल चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त पियूष सिंह यांच्या आदेशावरून यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या १० विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली. त्यानुसार, १२ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत मालेगाव तालुक्यातील संबंधित ८६ ग्रामपंचायतींमध्ये ‘रोहयो’अंतर्गत झालेल्या विविध कामांची चौकशी पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना करावयाची होती. प्रत्यक्षात मात्र सुरूवातीच्या काही दिवसांत बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये पथक पोहचलेच नाही. हा प्रकार सर्वप्रथम ‘लोकमत’नेच प्रकाशित केलेल्या वृत्ताच्या माध्यमातून उघड केला. त्याची दखल घेऊन संनियंत्रण अधिकाºयांनी ग्रामस्तरीय अधिकाºयांना चौकशी पथक येतेवेळी हजर राहण्याच्या सूचना दिल्या. सोबतच चौकशी पथक ठराविक ग्रामपंचायत क्षेत्रात पोहचून चौकशी करते किंवा कसे, यावरही ‘वॉच’ ठेवण्यात आला. त्यामुळे पुढील नियोजित तारखांना त्या-त्या ग्रामपंचायतींमध्ये पथक पोहचून चौकशी करण्यात आली.
दरम्यान, मालेगाव तालुक्यातील संबंधित सर्व ग्रामपंचायतींमधील रोजगार हमी योजनेच्या कामांची नियोजनबद्ध कार्यक्रमानुसार चौकशी करून तसा अहवाल वेळेत विभागीय आयुक्त कार्यालयास सादर करावा, असे स्पष्ट निर्देश विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी दिले होते. असे असताना चौकशी प्रक्रिया संपून ४० दिवसांपेक्षा अधिक कालावधी होऊनही एकाही ग्रामपंचायतीचा चौकशी अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयास सादर झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मालेगाव तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या कामांची चौकशी करणाºया १० पथकांपैकी काहींचे चौकशी अहवाल जिल्हास्तरावर प्राप्त झाले आहेत. सर्व पथकांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर ते एकत्रीतरित्या आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात येतील.
- शंकर तोटावार
संनियंत्रण अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम
१२ ते ३१ डिसेंबर या कालावधीत पथकांना रोहयोच्या कामांची चौकशी करून तसे अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयास वेळेत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या; मात्र अद्यापपर्यंत एकाही पथकाचा अहवाल प्राप्त झालेला नाही.
- डी.पी. गव्हाळे
कार्यकारी अभियंता, रोहयो विभाग, आयुक्त कार्यालय, अमरावती