‘सूक्ष्म सिंचन’ ठरतेय मृगजळ!
By admin | Published: October 14, 2016 02:31 AM2016-10-14T02:31:00+5:302016-10-14T02:31:00+5:30
वाशिम जिल्ह्यासाठी तरतूद १0 कोटी २ लाखाची; प्राप्त केवळ दोन कोटी
वाशिम, दि. १३- प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजनेंतर्गत राबविण्यात येणार्या सूक्ष्म सिंचन योजनेसाठी 'ऑनलाइन ई-ठिबक प्रणाली'द्वारे ११ हजार ३७६ शेतकर्यांनी अर्ज दाखल केले. मात्र, त्यासाठी आवश्यक अनुदानाच्या तुलनेत कृषी विभागाला केवळ २ कोटी ६१ लाख रुपयेच प्राप्त झाले असून उर्वरित अनुदान लवकरच प्राप्त न झाल्यास जिल्ह्यातील हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणार्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेसाठी वाशिम जिल्ह्यात यंदा एकू ण ११ हजार ३७६ शेतकर्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले. त्यात ठिबकसाठी १ हजार ९५२; तर तुषार संचाकरिता ९ हजार ४२४ शेतकर्यांचा समावेश आहे. वाशिम जिल्हा अवर्षण क्षेत्राबाहेरच असल्याने नियमानुसारच लाभार्थींना अनुदान मिळेल. गत दोन वर्षांत अर्थात २0१४-१५ आणि २0१५-१६ या वर्षांत अनेक शेतकर्यांना अद्याप या योजनेतून अनुदान मिळू शकले नाही. यंदा शासनाने जिल्ह्यासाठी सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत ठिबक आणि तुषार सिंचनासाठी १0 कोटी २ लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यापैकी केवळ २ कोटी ६१ लाख रुपये ऑनलाइन प्राप्त झाले असून, याच अनुदानाच्या आधारे शेतकर्यांना पूर्वसंमती दिली जाणार आहे. त्यामुळे ११ हजार ३७६ शेतकर्यांपैकी हजारो शेतकरी पहिल्या टप्प्यातील निधीच्या अनुदानापासून वंचित राहणार आहेत. याशिवाय नंतरही अनुदान प्राप्त झाले तरी, अर्जांची संख्या पाहता सर्वांना पूर्वसंमती मिळणे अशक्य असल्याने हजारो शेतकरी या योंजनेपासून वंचित राहतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजनेंतर्गत प्राप्त लाभार्थी व आवश्यक अनुदानासंबंधीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. मात्र, शासनाकडून टप्प्याटप्प्याने अनुदान दिले जात असल्याने प्रश्न उद्भवत आहे.
- दत्तात्रेय गावसाने
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम